Friday, April 26, 2024
Homeनाशिकश्रद्धा, सामाजिक आरोग्य जपत नाताळला सुरुवात

श्रद्धा, सामाजिक आरोग्य जपत नाताळला सुरुवात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक आरोग्य यांची योग्य सांगड घालत ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्रीपासून नाताळ साजरा करायला सुरुवात केली. ईश्वरा बरोबरच मानवी आरोग्यालाही तेवढेच प्राधान्य देण्यात आले.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असणारे जेलरोड येथील संत अण्णा महाचर्च, नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशु मंदिर, वॉस्को चौकाजवळील सेंट फिलिप चर्च बंद होते. मात्र रोषणाई तसेच प्रभू येशू जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. चर्चमध्ये नेहमीप्रमाणे नाताळच्या आदल्या मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली नव्हती. प्रार्थना सभा, प्रभू येशूची गीते आदी भरगच्च कार्यक्रम झाले नाहीत.

ख्रिस्ती बांधवांनी दरवर्षीप्रमाणे एकमेकांना भेटून गळा भेट घेत किंवा हस्तांदोलन करत शुभेच्छा देणे टाळले. फोन वरच एकमेकांना शुभेच्छा देणे पसंत केले. नाताळचा उत्साह थोडा देखील कमी झालेला नव्हता. शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे महा धर्मगुरू बिशप लुडस डॅनियल, फादर ट्रिव्हर मिरांडा, वेन्सी डिमेलो, पीटर डिसुझा, रॉबर्ट पेन यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा संदेश दिले.

दरम्यान, आज (दि.25) नाताळच्या दिवशी चर्चमध्ये भाविकांना दिवसभरात मोजक्याच संख्येने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी एकाऐवजी तीन ते चार प्रार्थनासभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी मोजक्या भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ सणावर होणारा खर्च टाळून तो निधी गरीब नागरिक, रुग्ण, बेरोजगार यांना देऊन सामाजिक आदर्श निर्माण करण्यात येणार आहे.

ईश्वराची माया आटत नाही : बिशप

मानव पुन्हा पुन्हा चुकतो, पापात पडतो. तरीही ईश्वराची मानवावरची माया आटत नाही. मानवाच्या तारणासाठी तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. ईश्वराचे प्रतिरूप असलेल्या मानवाने क्षमाशीलता, अहिंसा, बंधुभाव, प्रेम ही ईश्वरी मूल्ये आपल्या कृतीतून जपली पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक कॅथोलिक धर्म प्रांताचे महा धर्मगुरू बिशप लुडस डॅनियल यांनी आज केले. नाताळनिमित्त त्यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभ संदेश दिला. बिशप संदेशात म्हणाले की, परस्पर सौहार्द जपूनही अन्यायाचा प्रतिकार करता येतो, हे येशूने स्वदेहाची आहुती देऊन दाखवून दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या