Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallary : सामुहिक प्रार्थना, शुभेच्छांच्या वर्षावात नाताळ साजरा

Photo Gallary : सामुहिक प्रार्थना, शुभेच्छांच्या वर्षावात नाताळ साजरा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मध्यरात्री झालेल्या येशु जन्माचे जोरदार स्वागत, एकमेकांना शुभेच्छा तर आज दिवसभर सामुहिक प्रार्थना अशा वातावरणात शहरभरात नाताळ सण साजरा झाला. परंतु करोनाच्या सावटात अटी शर्तींचे पालनाने मर्यादा आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या आनंदावर पाणी फेरल्याचेही चित्र होते.

- Advertisement -

गुरूवारी रात्री बारा वाजता सर्वत्र येशु ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत झाले. शरणपूर रस्त्यावरील संत आंद्रीया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील संत अ‍ॅना आदी ठिकाणी सामूहिक प्रार्थनेद्वारे भाविकांनी हा जन्मोत्सव साजरा केला.

दरवर्षी नाताळनिमित्त मध्यरात्रीच्या वेळी चर्चध्ये ख्रिस्ती बांधवांची लक्षणीय गर्दी होत असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विविध नियमावली आखून दिलेली होती. त्यानुसार चर्च प्रशासनामार्फत नाताळाचे नियोजन केले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.25) मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत प्रार्थना (मिसा) पार पडली. तर टप्या-टप्याने भाविकांना चर्चच्या गाभार्यात दर्शनासाठी सोडले जात होते. चर्चच्या आतील भागात तसेच आवारातही आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केलेली होती.

नेहमीचप्रमाणे चर्चच्या आवारात गव्हाणात बाळ यशूच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याच्या भोवती छायाचित्र, सेल्फी टिपण्याचा मोह तरूणाईला आवरत नव्हता. भाविकांच्या सूविधेसाठी यंदा सॅनिटायझर उपलब्ध करून देतांना अन्य विविध बाबींची उपलब्धता केलेली होती. तसेच आलेल्या भाविकांना मास्क वापराचे आवाहन केले जात होते.

सर्वधर्मियांचा उत्साह

करोनामुळे नाताळ साजरा करताना ख्रिस्ती बांधवांना बंधने आली असली तरी समाजातील सर्वधर्मियांनी आपआपल्या परिने घरोघरी हा सन साजरा केला. अनेकांनी आपल्या घरी सजवलेले क्रिसमस ट्री, केक, सांताक्लॉज यांची छायाचित्र सोशल मिडीयावरून व्हायरल करत नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या नाताळच्या शुभेच्छांचा वर्षांव आज दिवसभर सुरू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या