नांदूरमध्यमेश्वरला वसताेय ‘चित्रबलाक’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सुमारे मीटरभर उंचीचा देखणा करकोचा म्हणजे ‘चित्रबलाक’ पक्ष्यांची छानशी वस्ती नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात सध्या तळ ठोकून आहे. वीणीचा हंगाम असल्याने या पक्ष्यांच्या कलकलाटाने परिसर गजबजून गेल्याचे चित्र असून या पक्ष्यांचे व त्यांच्या पिल्लांचे रक्षण केले जात आहे.

नांदूरमध्यमेश्वरला ‘रामसर’ चा दर्जा मिळल्यानंतर त्याचे महत्त्व वाढले आहे. येथील दलदलीचा भुभाग सध्या विविध परदेशी पक्ष्यांसाठी निवाऱ्याचा झाला आहे. या अभयारण्यात इतिहासात नाेंद हाेईल अशी घटना पाहायला मिळत असून चित्रबलाक पक्षी येथे स्वत:ची वसाहत बनवत आहे. गेल्या वर्षीही नांदूरमध्यमेश्वरमध्ये विविध पक्ष्यांच्या छोट्या गटाने घरटी बांधली होती. तसेच चित्रबलाकच्या तीन जोड्यांनी सहा पिल्लांना जन्म दिला हाेता.

दरम्यान, मागील १५ पक्ष्यांच्या तुलनेत यंदाच्या या पाहुण्यांची संख्या सुमारे ४० झाली आहे. तब्बल २४ वर्षानंतर नांदूरमध्यमेश्वर येथे अभयारण्याच्या इतिहासात प्रथमच हे पक्षी येथे आपली वसाहत बनवत असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षी पाऊस चांगला होता म्हणून नांदूरमध्यमेश्वर धरण भरले आहे. यावर्षी चित्रबलाक पक्ष्याने आपले घरटे बनवण्याकरीता याेग्य वातावरणलपाहून घरटी बांधण्यास सुरवात केली आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत या पक्ष्याचा प्रजनन कालावधी असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या पक्ष्यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये घरटे बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु घरटे बांधल्यानंतरही पाण्याअभावी त्यांनी अंडी दिली नाहीत. गेल्या वर्षी, या पक्ष्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाभळीच्या झाडावर बारीक, जाड काड्यांचा वापर करून घरटे बांधण्यास सुरवात केली होती. यावर्षीही पाण्याची पातळी समाधानकारक असून पक्षी अंडी देतील अशी अपेक्षा आहे.

हा पक्षी स्थलांतर करणारा आहे. दिवसभर दलदली, तलाव, भात शेतात पाण्यासाठी उभे राहतात. पाण्यातील बेडूक, मासे, छाेटे साप, गोगलगाई आणि इतर लहान शिकार करून उपजिविका भागवतात.

कायम वसाहत बनू शकेल

‘गेल्या वर्षी चित्रबलाकचा एक गट अभयारण्यात राहिला होता. त्यांनी अंडीही दिली. यावर्षीही पक्षी आले आहेत आणि त्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. घरटे बांधण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. पक्षी येथे वसाहत बनवत असल्याने ते त्यांच्यासाठी कायमचे स्थान ठरू शकेल.

– अशोक काळे, सहाय्यक वनसंरक्षक, नांदूरमध्यमेश्वर.

पक्ष्यांची संख्या वाढली

‘चित्रबलाक’ नांदूरमध्यमेश्वर येथे आले आहेत. त्यांनी आपले घरटे बांधण्यास सुरवात केली. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या येथे सुमारे ४० पक्षी आहेत. गवताच्या व काड्यांच्या साहाय्याने बाभूळाच्या झाडावर घरटी बांधत आहेत.

— गंगाधर आघाव, पक्षी निरीक्षक, नांदूरमध्यमेश्वर.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *