Friday, April 26, 2024
Homeनगरढोबळी मिरचीच्या उत्पादनातून अर्थप्राप्तीचा गोडवा

ढोबळी मिरचीच्या उत्पादनातून अर्थप्राप्तीचा गोडवा

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

केलवड सारख्या जिरायती भागात कष्ट करण्याची जिद्द आणि प्रयोगशिलतेच्या जोरावर शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया एका शेतकर्‍याने साधली आहे. करोनाच्या काळातही चांगले उत्पादन घेऊन क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन घेत बाळासाहेब सुधाकर गमे यांनी इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरेल अशी ढोबळी आपल्या शेडनेटमध्ये पिकविली आहे.

- Advertisement -

दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करत या शेतकर्‍याने हार न मानता कष्टाला महत्त्व दिले. यापूर्वी भुसार पिके काढून उपजिविका करत असतानाच राज्याचे माजी कृषी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेडनेटची अनुदान योजना आणली. यावेळी अस्तगावला डाळिंबावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. काही शेतकर्‍यांबरोबर बाळासाहेब गमे हेही चर्चासत्रात सहभागी झाले. शेडनेट बाबतचे मार्गदर्शन एकूण प्रभावीत झालेले गमे यांनी आपल्या शेतातील 20 गुंठ्यात शेड उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे मार्गदर्शन मिळाले. शेडनेट उभारणीपासून तर विक्रीपर्यंतचे सर्व टप्प्यांची माहिती बोराळे यांनी गमे यांना दिली. यातून गमे यांना दिशा मिळाली.

शेड नेटची रक्कम भरण्यासाठी राहाता येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक प्रसाद तांबे यांनी सहकार्य करुन कर्ज उपलब्ध करुन दिले. शेड नेट 2014 ला उभे राहिले. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीचा सतत सामना करत असताना बाळासाहेब गमे यांनी ढोबळी मिरची, कधी झेंडू, कधी काकडीचे पीक घेत अर्थप्राप्ती केली. ढोबळी मिरचीचे 2018 ला विक्रमी उत्पादनही घेतले. कधी कधी बाजारभाव नसतानाही काही प्रमाणात नुकसानही सोसावे लागले. या 20 गुंठ्यात त्यांनी ठिबक सिंचन केले. आ. विखे पाटील यांच्या त्या काळच्या कृषी विभागाच्या संकल्पनेतील शेततळे उभारले. या शेततळ्याला विहिरीद्वारे भरण केले. पाणी कमी झाल्यावर शेततळ्यातील पाण्याचा वापर केला.

या हंगामात त्यांनी 1 जुलैला ढोबळी मिरचीची लागवड केली. पॅलेडिन या वाणाची लागवड त्यांनी शेडनेट मध्ये 20 गुठ्यात केली. 15 ऑगस्टला तोडा सुरू झाला. त्यांच्या या ढोबळी मिरचीची क्वालिटी उत्तम असल्याने स्थानिक बाजारपेठेत न विकता नाशिकच्या बाजारपेठेत त्यांनी विक्री करण्याचे ठरविले. स्वतःचे वाहन असल्याने ढोबळी मिरचीला नाशिकला विक्री करण्यास सुरुवात केली. पहिल्याच आठवड्यात सव्वाशे टन माल निघाला. 350 कॅरेट माल त्यांनी विक्री केला. त्यांना 30 ते 35 रुपये दर मिळाला.

बाळासाहेब गमे यांचे कुटुंबातील सर्व सदस्य शेडनेट मधील ढोबळी मिरचीची काळजी घेतात. तेथे ते 16 ते 18 तास काम करण्याची तयारी दाखवितात. आठवड्यातून दोनदा औषधांची फवारणी ते करतात. वारंवार देखरेख करणे, शेडनेटच्या बाहेर अर्धा एकर आद्रकाची त्यांनी लागवड केली आहे. याशिवाय त्यांच्याकडे मुक्त गोठा असल्याने गायींना मका केली आहे.

प्रयोगशिलता कायम ठेवत बाळासाहेब गमे यांनी सन 2018 मध्ये 20 गुंठ्यातील शेडनेट मधील ढोबळी मिरचीचे 42 टन विक्रमी उत्पादन घेतले. 4170 कॅरेट उत्पादन घेतले. या मिरचीचा तोडा चक्क वर्षभर मिळाला. त्यामुळे लागवड आणि काढणीला एक वर्ष झाले त्या दिवशी त्यांनी या ढोबळी मिरचीचा वाढदिवस साजरा केला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी मंत्री असताना खुप चांगले काम केले. शेतकरी हिताचे काम केले. त्यामुळे विविध योजना ग्रामीण भागात आल्या त्यांचा फायदा शेतकरी वर्गाला झाला. हे न विसरण्याजोगे आहे. संगमनेर विभागाचे उपविभागिय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी चांगले मार्गदर्शन केले.

– बाळासाहेब गमे, प्रयोगशील शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या