Friday, April 26, 2024
Homeनगरमुलांच्या गणवेशासाठी नगरपालिकेने दिले दीड लाख रुपये

मुलांच्या गणवेशासाठी नगरपालिकेने दिले दीड लाख रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपालिकेच्या नऊ शाळांमधून शिकणार्‍या सर्वसाधारण प्रवर्गातील मुलांच्या गणवेशासाठी नगरपालिकेने याही वर्षी 1 लाख 54 हजार 400 रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याहस्ते शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांना सुपूर्द केला.

- Advertisement -

शासनामार्फत शिक्षण घेणार्‍या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना दरवर्षी गणवेश दिले जातात. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. ही बाब पाच वर्षांपूर्वी नगरपालिका शाळा क्रमांक पाचच्या शाळा व्यवस्थापन समितीने नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून देत पालक संस्था म्हणून नगरपालिका शाळेतील अशा मुलांना गणवेश द्यावेत, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे मान्य केले होतेे.

गेल्या वर्षी करोनामुळे शाळा बंद असल्याने गणवेश दिले गेले नाहीत. मात्र आता शाळा सुरू झाल्याने नगरपालिकेच्या 9 शाळांमध्ये 386 सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी एक लाख 54 हजार चारशे रुपयांचा धनादेश पटारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. येत्या आठवडाभरात सर्व शाळांमधून या मुलांना गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे. गणवेश मिळण्याकामी नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र पवार, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक तथा मुख्याध्यापक सलीमखान पठाण, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी प्रकाश जाधव, शिक्षण मंडळाचे लिपिक रुपेश गुजर, उर्दू शाळेचे शिक्षक आसिफ उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक रुपेश गुजर, लिपिक किशोर त्रिभुवन तसेच संभाजी त्रिभुवन यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या