Friday, April 26, 2024
Homeनगररासायनिक खतांचे दर भिडले गगणाला खत टंचाई, महागाईने शेतकरी मेटाकुटीला

रासायनिक खतांचे दर भिडले गगणाला खत टंचाई, महागाईने शेतकरी मेटाकुटीला

खैरी निमगांव |वार्ताहर|Khairi Nimgav

रासायनिक खतांचे वाढते दर तसेच खत टंचाई त्याबरोबरच वाढती महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता शेतीच्या उन्हाळ कामांना गती येणार असून अनेक जण शेणखतावर अधिक भर देताना दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दर वाढीमुळे मशागतीची कामे करताना पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढीसाठी नविन पर्यायाची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून शेतीचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झाले आहे. जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करण्यात येत आहे. रासायनिक खतांमुळे शेती उत्पादन वाढते हे खरे. पण त्याचे अनेक दुष्परिणामही आता जाणवू लागले आहेत. रासायनिक खते वापरून उत्पादित केलेल्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने माणसाच्या आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होत आहे. याला फ्रान्समधील संशोधकांनी पर्याय शोधून काढला आहे.

रासायनिक खतांऐवजी शेतीसाठी मानवी मूत्राचा वापर करणे हा तो पर्याय आहे. रासायनिक खतांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत. त्याचाच भाग म्हणून फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी मानवी मूत्राचा पर्याय सुचविला आहे. शेतामध्ये मानवी मूत्राचा वापर केल्याने पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनही चांगले मिळते, असा त्यांचा दावा आहे.

शास्त्रज्ञ फॅबियन एस्कुलियर सांगतात की, पिकांच्या जोमदार वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. हे सर्व घटक मानवी मूत्रामध्ये असतात. फक्त त्यावर काही प्रक्रिया कराव्या लागतील. त्यानंतर त्या मूत्राचा वापर रासायनिक खतांऐवजी शेतीमध्ये करता येईल. प्राचीन काळी मानवी मलमूत्राचा उपयोग शेतीसाठी केला जात होता. पुढे त्याची जागा रासायनिक खतांनी घेतली, परंतु आता पुन्हा एकदा पारंपरिक शेतीकडे वळण्याचा शेतकर्‍यांचा कल वाढू लागला आहे.

शेतकरी सध्या ऑर्गेनिक फार्मिंग अर्थात सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत, परंतु सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण नगण्य आहे. मानवी मूत्राचा वापर केल्यास सेंद्रिय शेतीची ही कल्पना नव्याने पुढे नेता येणार आहे. सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणासही कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे भविष्यात सेंद्रीय शेतीच केली जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या