Saturday, April 27, 2024
Homeनगररासायनिक खतांचे दर दीड पटीने वाढले

रासायनिक खतांचे दर दीड पटीने वाढले

राजेंद्र गाडे

चासनळी (वार्ताहर) – रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे. खरीप हंगाम जवळ येत असताना रासायनिक खतांचे भाव वाढल्यामुळे शेतकर्‍याचे मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

- Advertisement -

मध्यंतरी काही दिवसापूर्वी रासायनिक खताच्या किमती अजिबात वाढणार नाही असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र खरीप हंगाम जवळ येताच खताच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सरकारने शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.

अतिवृष्टी, नापिकी, आणि बेमोसमी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. पेरलेले उगवेल याची शाश्‍वती नसते. त्याला अपेक्षित दर मिळत नाही. शेतकर्‍यांसाठी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. त्यात करोनाने जखमेवर मीठ सोडल्यामुळे शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे अर्थकारण ढासळले आहे. शेती करताना रासायनिक खत वापरावी लागतात. शेणखत सगळ्यांना उपलब्ध होईल असे नाही.

त्यात शेणखताची मात्रा लगेच लागू होत नसल्यामुळे रासायनिक खते वापरावी लागतात. पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याचे बोलले जाते. मात्र पेट्रोलच्या किमतीत आणि खतांच्या किमतीमधील बदल भरमसाट असल्यामुळे शेतकर्‍यावर अन्याय केल्याचे बोलले जाते. त्यात डिझेलच्या भाववाढीमुळे मशागतीचे नियोजन कोलमडून गेले आहे. ट्रॅक्टर ची मशागत महागले असून नांगरणी, पेरणी, रोटावेटर, सरी पाडणे आदी कामे टॅक्टरने केली जातात त्यामुळे खर्चाचा मेळ बसणे अवघड झाले आहे.

खतांच्या किमती वाढल्यामुळे पेरायचे काय आणि खायचे काय? अशीच भावना असल्यामुळे शेतकर्‍यांनी करायचे काय हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पन्नास ते शंभर रुपयाची वाढ न करता 600 ते 700 रुपयाची वाढ म्हणजे शेतकरी उध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

– सुभाष आहेर, शेतकरी, चासनळी

खताच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तर द्यावे लागतात. त्यात मिळणारे तुटपुंजे कमिशन, भांडवल गुंतवणूक वाढल्यामुळे नफा न मिळता तोटा होत आहे. गोडाऊन, भाडे, हमाली जीएसटी, इन्कम टॅक्स याचा हिशोब केला तर जेवढा जास्त माल विकाल तेवढा तोटा वाढणार आहे. त्यात प्रत्येकाचे आधार कार्ड घेऊन पॉश मशीन वरून माल विकावा लागतो.

– चंद्रशेखर चांदगुडे, खत विक्रेता, चासनळी.

- Advertisment -

ताज्या बातम्या