Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्ररासायनिक कंपनी आग प्रकरण : चौकशीनंतर दोषींवर कारवाई - दिलीप वळसे...

रासायनिक कंपनी आग प्रकरण : चौकशीनंतर दोषींवर कारवाई – दिलीप वळसे पाटील

पुणे (प्रतिनिधि) – पिरंगुट येथील आग प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी येथे सांगितले. तर या घटनेमुळे पुन्हा ‘महाराष्ट्र राज्य अग्नीप्रतिबंधक दला’ची गरज निर्माण झाली असून, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सकाळी आग लागलेल्या कंपनीस भेट देवून पाहणी केली. त्यानंतर उरवडे गावाजवळील कांजणे वस्ती येथे आगीत बळी पडलेल्या ४० वर्षीय गीता दिवाडकर यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांनी सांत्वन केले.

- Advertisement -

याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, कंपनीतील ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली व क्षणार्धात ती भडकल्याने १८ जणांचा बळी गेला. आग कशी लागली, काेणाची चूक झाली, याबाबत चौकशी अहवाल मंगळवारी रात्रीपर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सुळे म्हणाल्या, शहरी भागात अग्नीशमन यंत्रणा अस्तित्वात आहे. परंतु, ग्रामीण भागात संबंधित यंत्रणा पुरेशा क्षमतेने नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये जीवितहानीची शक्यता अधिक वाढते. मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात अग्नीप्रतिबंधक दल स्थापनाकरिता पाठपुरावा करणार आहे.

आग लागल्याने डिजिटल दरवाजा उघडलाच नाही

मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे सोमवारी कंपनीला आग लागल्यापासून मंगळवारी दिवसभर कंपनीत एमआययडीसी व हिंजवडी अग्नीशामक दलासोबत कुलिंगचे काम करत होते. अॅसिड व केमिकल कंपनीच्या परिसरात पसरले असल्याने काम करणे जिकरीचे होत होते. ते म्हणाले, कंपनीस चारी बाजूने कम्पाऊंड असून अडकलेल्या महिला कंपनीच्या एसी रुममध्ये पॅकिंगचे काम करत होत्या. खोलीचा दरवाजा डिजीटल पद्धतीने स्लायडिंगने उघडला जात होता. परंतु आग लागल्याने दरवाजा उघडला गेला नाही व महिला खोलीतच अडकून पडल्या. या खोलीच्या मागील भिंत आणि कपांऊड जेसीबीच्या सहाय्याने फोडून तसेच पत्रे उचकटून धूर, आग बाहेर जाण्यास जागा दिल्यावर आतील गोष्टी दिसू लागल्या. परंतु सर्वच महिला तसेच पुरुष जळून खाक झाले होते व केवळ त्यांचे सांगाडे मिळाले, असे त्यांनी सांगितले.

डीएनएनंतरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले, संबंधित कंपनीत लागलेल्या आगीनंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नऊ जणांची चौकशी समिती मावळ प्रांताधिकारी यांचे अध्यतेखाली जिल्हाधिकारी यांनी नेमली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुण्यातील ससून रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात येत असून, कुटुंबियांच्या डीएनए नमुने तपासणीनंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली आहे. पौड पोलीस ठाण्याते पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या