Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedछत्रपती संभाजीराजेंच्या जयघोषाने दुमदुमले आसमंत!

छत्रपती संभाजीराजेंच्या जयघोषाने दुमदुमले आसमंत!

औरंगाबाद – aurangabad

‘शिवछत्रपतींचा जयघोष’, ‘शिवभक्तीचा जागर’ आणि आसमंतात दुमदुमणाऱ्या हर हर महादेवच्या (Har Har Mahadev) गर्जनेने शनिवारची सायंकाळ औरंगाबादकरांसाठी संस्मरणीय ठरली. (shivsena) शिवसेना औरंगाबादच्या वतीने आयोजित छत्रपती शंभूराजे महोत्सवाचा (Chhatrapati Shambhuraje Festival) समारोप ‘छावा’ या महानाट्याचे खुल्या प्रयोगाने झाला. यावेळी मोठी गर्दी उसळली होती.

- Advertisement -

टीव्ही सेंटर हडको येथील छत्रपती संभाजीराजे मैदानावर आयोजित तीन दिवसीय शंभूराजे महोत्सवाचा समारोप लेखक-दिग्दशर्क महेंद्र महाडिक यांचे ‘छावा’ या महानाट्याने झाला. यावेळी छत्रपती शंभूराजे महोत्सवाचे संयोजक तथा आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महानाट्याची सुरुवात रोमांचक अशा प्रसंगाने झाली. भव्य अशा व्यासपीठावर छत्रपती शिवरायांना आग्राच्या कैदेतून मोठ्या शिताफीने निसटण्याचा प्रसंग अवतरला. वयाच्या आठव्या वर्षी संभाजी महाराजांनी आपल्या अक्कल हुशारीने आणि मेहनतीने ही सुटका यशस्वी केली. शिवाजी महाराज नजरकैदेत असताना त्यांना सोडवून आणण्यासाठी संभाजीराजेंनी आग्र्याच्या प्रत्येक रस्त्याचे-मार्गाचे रेखाटन कापडावर केले… कसे त्यांनी पुण्यातून आग्र्यात व्यवसायासाठी आलेल्या कुंभाराची मदत घेतली… मोहरे देऊन कशी रणनीती आखली… आणि ती मोहीम फत्ते केली. हा रोमांचक इतिहास रंगमंचावर साकारण्यात आला. यावेळी उपस्थित श्रोत्यांच्या मुखातून आपोआपच ‘हर हर महादेव’चा जयघोष निघाला.

‘छत्रपती संभाजीराजेंसारखा आपल्या सैन्यात सैनिक असता तर आपण केव्हाच शहंशाह झालो असतो’, अशी खंत व्यक्त करणाऱ्या औरंगजेबच्या वाक्याने छत्रपती किती मोठे लढवय्ये होते याची जाणीव होऊ शकते. वयाच्या सोळाव्या वर्षी राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या पंधराच दिवसात मोठ्या मोहिमेला जात ती यशस्वी करण्याने औरंगजेबाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. बुऱ्हाणपूर लूट आणि त्यातच औरंगजेबच्या मुलाला शहजादा अकबरला आश्रय दिल्याने छत्रपती संभाजीराजे नजरेत अडसर ठरू लागले. त्यामुळे औरंगजेब एवढा चिडला की तो उत्तरेकडची आलिशान गादी सोडून मराठ्यांवर आक्रमण करण्यास मोठा फौजफाटा घेऊन दख्खनला चालून आला, यासह कितीतरी महत्त्वपूर्ण घडामोडी छावा नाट्यात दर्शवण्यात आल्या.

मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही.

औरंगजेबाने तब्बल ३९ दिवस छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले. त्या घटनांच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यात अश्रू आले. छत्रपतींची गौरवगाथा प्रत्यक्षात अनुभवण्याची ही अनोखी संधी होती. कितीतरी माहीत नसलेल्या, चर्चेत न आलेल्या शौर्य घटनांचा यामध्ये समावेश होता. दमदार अभिनय, दर्जेदार ध्वनीव्यवस्था आणि उत्तम अशा ‘छावा’च्या सादरीकरणाने संभाजीनगरकरांमध्ये एकप्रकारे रोमांच उभे केले. छावा’ नाट्यात बालसंभाजीची भूमिका कनाद सावरकर, विशाल बोडके, हर्षद पाटील यांनी केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका महेश बुलाख, यसूबाईची भूमिका अमृता महाडिक यांनी साकारल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर संतोष जेजुरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटक मीना फसाटे, जयश्री लुंगारे, अनिता मंत्री, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, मीरा देशपांडे, नलिनी महाजन, मीनाताई गायके, सुकन्या भोसले, उपशहर प्रमुख संदेश कवडे, सुरेश कर्डिले, मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, अनिल जैस्वाल, वीरभद्र गादगे, राजू इंगळे, किशोर नागरे, गजानन मनगटे, मोहन मेघवाले, बन्सीमामा जाधव, धर्मराज दानवे, ज्ञानेश्वर शेळके, गौरव पुरंदरे आदी उपस्थित होते.

इतिहास घडवण्याची जबाबदारी युवा पिढीची – आमदार अंबादास दानवे

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाभर पोहोचलेला आहे. परंतु, सव्वाशे लढाई लढताना एकही लढाई पराभूत न झालेल्या छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास देखील कानाकोपऱ्यात पोहोचावा हा या महोत्सवामागचा हेतू आहे. युवा पिढीला शंभूराजेंच्या कार्यातून दिशा मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिवसेना औरंगाबादच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला असल्याचे मनोगत महोत्सवाचे संयोजक तथा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. गर्दीपेक्षा दर्दी युवकांनी, औरंगाबादवासीयांनी या महोत्सवात सहभागी होऊन भरभरून प्रेम दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या