स्वस्त धान्य प्रकरण : राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष संतोष परते व गोदामपालास अटक

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वस्त धान्य घेऊन जाणार्‍या चार ट्रक पोलिसांनी पकडल्या होत्या. या स्वस्त धान्य प्रकरणी राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असलेला सब ठेकेदार संतोष काळू परते व तहसील विभागाचे

गोदामपाल भाऊसाहेब काशिनाथ गंभिरे यास राजूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी या अगोदर अकोले तालुक्यातील हौशीराम दिनकर देशमुख (रा. केळुंगण, साई संदेश धुमाळ रा. धुमाळवाडी), योगेश राजेंद्र धुमाळ (रा. अकोले) व अशोक हिरामण देशमुख (रा. केळुंगण) या चार वाहन चालकांना अटक केली असून त्यांना 17 तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.

या घटनेनंतर तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आदिवासी संघटनांनी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे अध्यक्ष अशोक माळी, सचिव मारुती शेंगाळ यांनी तहसीलदार यांचे कडे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची कसून चौकशी करावी अशी मागणी निवेदना द्वारे केली होती. हे प्रकरण दडपले गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.

राजूर पोलिसांनी बुधवारी दुपारी अनधिकृत वाहनांतून नेत असलेले स्वस्त धान्य घेऊन जाणार्‍या ट्रक चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसील कार्यालयात येत पुरवठा विभागाकडे चौकशी केली होती व अधिकार्‍यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

शनिवारी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या आदेशानुसार पकडलेले धान्य अकोले येथील शासकीय गोदामात उतरविण्यात आले. या चारही वाहनांतील एकूण धान्य साठा बरोबर असला तरी वाहनांमध्ये असलेल्या धान्य साठ्यात तफावत असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले. प्रत्येक गाडीत असणारा धान्य साठा खाली करत असताना त्यात असणारा माल आणि पावत्यांवर नोंदविण्यात आलेल्या मालात कमी अधिक प्रमाण असल्याचे पोलिसांना आढळून आले.

यावेळी अधिक चौकशी कामी पोलिसांनी गोदाम ताब्यात घेतले असून त्यांचा लेखी जबाब घेण्याचे काम सुरू होते. याच प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तहसील विभागाचे गोदाम पाल भाऊसाहेब गंभिरे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानुसार रात्री संतोष परते या सब डीलरलाही ताब्यात घेतले व त्यांच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. व त्यांना अटक केली. रविवारी त्या दोघांही न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेशनिंगचा माल पुरविणार्‍या वाहनांची माहिती, अधिकृत ठेकेदार या व इतर आवश्यक असणार्‍या माहिती बाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांना पोलिसांनी पत्र दिले आहे. शनिवार असल्याने ही माहिती त्यांना मिळाली नाही. रजिस्टरच्या सत्यप्रति तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या चारही ट्रक संदर्भातील माहिती वाहन प्रादेशिक अधिकारी (आरटीओ) यांच्या कडे मागविण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व तपासी अधिकारी नितीन खैरनार यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे, ग्राहक मंचाचे मच्छिंद्र मंडलिक यांनी या प्रकरणी तहसील कार्यालयातील अन्य अधिकारी यांची चौकशी करावी. तसेच पोलिसांनी यामध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास करावा अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना गुन्हेगार हा कोणत्या पक्षाचा आहे याला महत्व नाही, राष्ट्रवादी काँग्रेस व लोकप्रतिनिधी यांची भूमिका ही चुकीच्या गोष्टीला समर्थन करण्याची नसल्याचे सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *