Friday, April 26, 2024
Homeनगरचासनळीच्या यात्रेत दोघांवर चॉपरने हल्ला

चासनळीच्या यात्रेत दोघांवर चॉपरने हल्ला

चासनळी |वार्ताहर| Chasnali

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जगदंबा यात्रेनिमित्त आयोजित आर्केस्ट्रा संपल्यानंतर यात्रा कमिटीचे सदस्य नकुल चांदगुडे व आणखी एका तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. हल्ला करणारा तरुण गावातीलच असून त्याचे नाव अभिजीत ससाणे असून हल्ला केल्यानंतर साथीदारांसह तो पसार झाला आहे.

- Advertisement -

चासनळीत यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये मारामारी होणार याची कल्पना अगोदरच यात्रा कमिटीस आली होती. त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऑर्केस्ट्रा संपल्यानंतर पोलीस निघून गेले. त्यानंतर यात्रा कमिटीच्या सदस्यांबरोबर या टोळीने हुज्जत घालण्यास सुरूवात केली. मागील भांडणाचे उट्टे काढत अचानक चॉपरने वार केल्यामुळे धावपळ उडाली. अंधाराचा फायदा घेऊन चार ते पाच जणांची ही टोळी पसार होण्यात यशस्वी झाली. मागील वर्षी देखील याच टोळीतील काही सदस्यांनी ऑर्केस्ट्रा मध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

यात्रा कमिटीच्या सदस्यावर हल्ला झाल्यामुळे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत चासनळी गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. पोलीस आल्यामुळे वातावरण शांत झाले. मात्र ग्रामस्थांच्या मध्यस्तीने आठवडे बाजार असल्यामुळे दुकाने खुली करण्यात आली. स्थानिक पुढार्‍यांचा गावावर वचक राहिला नाही. त्यामुळे राजकारणासाठी काहींना हाताशी धरून एकमेकाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न चालू असतो.

चासनळीत दोन महाविद्यालये असून कॉलेज सुटल्यानंतर मोटरसायकल घेऊन फिरणार्‍यांची संख्या देखील भरपूर झाली आहे. त्यांना जाब विचारण्याची कोणी हिंमत करत नाही त्यामुळे या गुंडाची हिंमत वाढली आहे. आरोपी व त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी यासाठी गावातील ज्येष्ठ व तरुणांनी एकत्रित येऊन या गावगुंडांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी नकुल चांदगुडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात आरोपी अभिषेक राजेंद्र ससाणे, शुभम संतोष धुमाळ, दर्शन राजेंद्र कटारे यांच्याविरूध्द गुन्हा रजि.न. 82/2023, भादंवि कलम 324,323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.कॉ.संदीप बोठे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या