Thursday, April 25, 2024
Homeनगरचन्या बेग व राहुरी पोलिसांची शाब्दीक चकमक

चन्या बेग व राहुरी पोलिसांची शाब्दीक चकमक

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरु सुफी जरीफची हत्या करणार्‍या संशयित मारेकर्‍यासह त्याच्या तीन साथीदारांना राहुरी पोलिसांनी काल गुरूवारी दुपारी राहुरी न्यायालयात हजर करण्यासाठी नेले. मात्र न्यायालय परिसरात श्रीरामपूर येथील सागर उर्फ चन्या बेग सह तीन आरोपींनी गोंधळ घालून पोलिसांच्या कामात अडथळा आणून दहशत निर्माण केली.

- Advertisement -

पोलिसांनी चन्या बेग यास प्रतिकार करून शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी एका पोलीस अधिकार्‍याबरोबर त्याची शाब्दीक बाचाबाचीबरोबरच झटापट झाली. चन्या उर्फ सागर बेग, त्याचा भाऊ आकाश बेग व काथे या तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरू सुफी जरीफची हत्या करणार्‍या संशयित आरोपींना राहुरी न्यायालयात गुरूवारी दुपारी हजर करण्यासाठी शासकीय वाहनातून आणण्यात आले होते. यावेळी शासकीय वाहनात राहुरीत सापडलेल्या औषध साठ्यातील दोन आरोपी तर वरशिंदे येथे दरोडा टाकण्याच्या तयारीतील सहा आरोपी व धर्मगुरुच्या हत्याकांडातील संशयित तीन आरोपी व इतर गुन्ह्यातील 7 ते 8 आरोपी असे एकूण 19 आरोपी आणण्यात आले होते.

धर्मगुरू हत्याकांडातील तीनही आरोपींना पळवून नेण्यासाठी चन्या बेग याने राहुरीत येऊन शासकीय वाहनात थेट घुसून आरोपींना पळविण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्ला केला असल्याची चर्चा सर्वत्र पसरली. मात्र पोलिसांनी या हल्ल्याचा इन्कार केला. चन्या बेग याने धर्मगुरुच्या हत्येतील आरोपींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे यांनी चन्या बेग यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांमध्ये शाब्दीक चकमक व झटापट झाली. बंदोबस्तावरील इतर पोलिसांनी चन्या बेगला ताब्यात घेतले. बेगच्या दोन साथीदारांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. चन्या बेगसह इतर तीन साथीदारांना दुसर्‍या शासकीय गाडीतून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घटनेनंतर राहुरी न्यायालय परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क करण्यात प्रयत्न केला परंतू त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. रात्री उशिरा चन्या उर्फ सागर बेग, त्याचा भाऊ आकाश बेग व काथे या तिघांविरोधात पोलिसांच्या कामात अडथळा, धमकी देणे, पोलिसांना संतप्त होण्यास प्रवृत्त करणे आदी कारणाासाठी भादंवि कलम 186 व कलम 189 नुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता वरील तीन आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्या वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे श्री. मिटके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या