Friday, April 26, 2024
Homeनगरचांगदेवनगर येथील भुयारी पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला

चांगदेवनगर येथील भुयारी पुलाच्या कामाला मुहूर्त सापडला

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील चांगदेवनगर येथे रेल्वे चौकीजवळ नियोजित भुयारी पुलाचे काम सुरू करण्यासाठी लोखंडी गज, सिमेंटसह इतर प्राथमिक साहित्य

- Advertisement -

काल सकाळी दाखल झाल्यामुळे या भुयारी पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे चांगदेवनगर, अठरावाडी, एकोणावीस चारीसह वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांमध्ये समाधान पसरले आहे.

दौंड-मनमाड या अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या रेल्वे मार्गावर छोटे-मोठे 69 पूल असून रेल्वे खात्याच्या धोरणानुसार प्रत्येक रेल्वे चौकीच्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार पुणतांब्यापासून जवळच असलेल्या जळगाव चौकी तसेच चितळी स्टेशन, धनगरवाडी येथील भुयारी पुलाची कामे पूर्ण झाली आहेत.

तेथील रेल्वे चौक्या बंद झाल्या आहेत. भुयारी पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र पुणतांबा येथील रेल्वे फाटकाचे ठिकाण व चांगदेवनगर येथील रेल्वे चौकीजवळ असलेल्या नियोजित भुयारी पुलाचे काम एक वर्षापासून विविध कारणामुळे सुरू झाले नव्हते.

मात्र काल पुलाच्या कामासाठी आवश्यक साहित्य रेल्वे चौकीच्या उत्तर बाजूला असलेल्या सिग्नलजवळ रेल्वे मार्गाच्या पश्चिम बाजूला चांगदेवनगर कारखान्याकडे जाणार्‍या वळण रस्त्यावर टाकण्यात आले. तसेच 10 ते 15 कर्मचार्‍यांनी प्राथमिक कामे तातडीने सुरू केल्यामुळे हा भुयारी पूल लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चांगदेवनगर येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यावरच पुणतांबा येथील नियोजित पुलाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. पुणतांबा येथे रेल्वे फाटकाच्या ठिकाणीच भुयारी पूल केला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रयत शाळेकडे भुयारी पुलासाठी जागा योग्य असली तरी तेथे अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे समजते.

दरम्यान चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम लवकर पूर्ण झाले तर गणपती फाटा ते चांगदेवनगर तसेच आशा केंद्र चौक या मार्गे वाहतुकीचे प्रमाण वाढणार असून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे रुंदीकरणही लवकरच हाती घेतले जाणार आहे. कारण सध्या हा रस्ता अत्यंत अरूंद झालेला आहे.

शिर्डीकडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा मार्गे वळविण्यात आली तर ती पुणतांबा येथील नियोजित भुयारी पूल रेल्वे फाटकाच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केला गेला तर चांगदेवनगर मार्गेच वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. या मार्गावर रहदारीचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान चांगदेवनगर येथील नियोजित पुलाचे काम सुरू झाल्यामुळे अनेकांनी व्यवसायासाठी मोक्याच्या जागा खरेदी करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या