Thursday, April 25, 2024
Homeनगरचांदा परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

चांदा परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

चांदा |वार्ताहर| Chanda

उन्हाळी कांदा निघाला त्याला भाव मिळेना, सोयाबीन पावसात गेलं, उरलं सुरल्याचा खेळ केला त्याला भाव नाही . कापसाची गत वाईट झाली. त्याचेही भाव मागे यायला लागले. नफा तर सोडा खर्चही निघेना अशा अवस्थेत बळीराजाची सहनशिलता आता संपत आली असून शेतकरी आता सामूहिकरित्या रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आला आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरातील शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष पसरला असून भाववाढीसाठी शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. उन्हाळी कांदा भाव चांगला मिळून खर्च निघेल अशा अपेक्षेने शेतकर्‍यांनी भुसारे भरून ठेवले होते. मात्र झालं भलतंच. भाव वाढ झालीच नाही. कांदा भुसार्‍यात सडू लागला. त्यातच गत आठवड्यापासून भाव मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.

त्यामुळे आता भुसार्‍यातील कांद्याचं काय होणार? अशी विवंचना असतानाच अतीवृष्टीने खरीपही गेला. अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन शेतातच गळून गेले. थोडेफार निघालेल्या सोयाबीन विक्रीसाठीही भाव मिळेना. तर कापसाची अवस्था भयानक झाली आहे. एकरी दोन ते चार क्विंटल निघालेला कापूस विक्रीसाठीही भाव मागे येऊ लागल्याने बळीराजापुढे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.

पीक विमा येईना पंचनामे होऊन मदतही येईना. चोहोबाजूंनी आर्थिक विळख्यात सापडलेला बळीराजा आता मात्र रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतात असणारा कापूस, सोयाबीनची खुलेआम चोरी होत आहे. रोज कुणाचा ना कुणाचा कापूस शेतातून चोरी जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या