Thursday, April 25, 2024
Homeनगरशाळा व्यवस्थापनासमोर उपाययोजनांचे आव्हान

शाळा व्यवस्थापनासमोर उपाययोजनांचे आव्हान

अहमदनगर/शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाने उद्या (दि. 23) पासून नववी ते बारावीच्या वर्गांना परवानगी दिली असली तरी नियमावलीचा विचार करता

- Advertisement -

सोमवारपासून लगेचच शाळा सुरू होणार नाहीत हे चित्र अधिक स्पष्ट होत चालले आहे. मार्चपासून ऑनलाईन सुरू असलेल्या शाळांची घंटा सोमवारपासून वाजण्याची अपेक्षा विविध अडथळ्यांच्या शर्यतीमुळे मंदावली आहे.

दरम्यान, नगरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्यास नकार घंटा वाजण्यास सुरूवात केली आहे. तर राज्य पातळीवरच्या शिक्षण विभागाने शनिवारी शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही झाल्याशिवाय शाळा सुरूच करू नका. सावकाशपणे सर्व नियम पूर्ण झाल्यावर शाळा सुरू करावी, अशी सूचना दिली आहे.

यामुळे सोमवारी जिल्ह्यातील 1 हजार 200 शाळांपैेकी किती शाळा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने 10 नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा घातलेल्या अटींच्या पुर्ततेवर अवलंबून आहे. यामध्ये शिकविणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर टेस्ट (कोवीड) करून घेणे बंधनकारक आहे.

शिक्षकांच्या तपासणीसाठी पुरेसे कीट नसल्याने अनेकांना चकरा मारण्याची वेळ आली. 18 तारखेला केलेल्या तपासणीचे अहवाल 21 तारखेपर्यंत आलेले नाहीत. नंतरचे कधी येतात यावर सोमवारी घंटा वाजेल की नाही हे अवलंबून आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने तर शहरी भागात नगरपालिकेने प्रत्येक शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यायचे व प्रत्येक पालकाचे संमतीपत्र भरून घेतल्यावरच संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश द्यायचा या अटींची पूर्तता करणे प्रत्येक शाळेवर बंधनकारक आहे. जे पालक संमतीपत्र भरुन देणार नाहीत, त्यांच्या मुलांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत जबरदस्ती करायची नाही, त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे.

ग्रामशिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करून जे पालक संमतीपत्र देणार नाहीत त्यांना यात सहभागी होण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्षात संमतीपत्रासाठी संपर्क साधत असताना पालक विद्यार्थी शाळेत पाठविण्यासाठी दिवाळीनंतर पुन्हा करोना हातपाय पसरू लागल्याने तयार दिसत नाहीत. किमान लस आल्यानंतर शाळा सुरू कराव्यात. यामुळे पालकवर्गाच्या प्रतिसादावरच शाळेच्या घंटेचा आवाज घुमेल. शाळेत प्रवेश देताना विदयार्थ्यांची दररोज थर्मलगनद्वारे तपासणी करायची आहे.

एखाद्या मोठ्या शाळेतील एका शिफ्टचे 50 टक्के विदयार्थी गृहीत धरून 500 विद्यार्थी शाळेत आले तर सर्वांच्या तपासणीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून किती तास लागतील व प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन किती वाजता सुरू होईल हा एक प्रश्नच आहे. ग्रामीण भागातील लाल परीच्या फेर्‍या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. बसअभावी ग्रामीण भागातील मुले व विशेषत: मुली शाळा, विद्यालयात पोचणार कशा? हा प्रश्न अधिक गंभीर आहे.

त्यासाठी ग्रामीण भागातील बस फेर्‍या पूर्ववत व नियमित सुरू करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ऑनलाइन शिक्षणाप्रमाणे ठराविक विद्यार्थीच प्रत्यक्ष शाळा कॉलेजमध्ये येऊन ऑफलाइन शिक्षणाचा लाभ घेतील. ऑनलाइनपासून वंचित असलेले विद्यार्थी ऑफलाइन शिक्षणालाही मुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना पालकांनी स्वतः वाहनाने शाळा-विद्यालयात आणून सोडावे असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

मात्र, अनेक पालकांकडे वाहनांची सोय नाही. असे पालक मुलांना शाळा विद्यालयात पोचविणार कसे? याची चिंता पालक व शाळा व्यवस्थापनांना लागली आहे. या सारख्या इतर उपाययोजनांचे आव्हान शाळा व्यवस्थापनासमोर उभे आहे. यामुळे प्रत्यक्षात किती शाळांची घंटा वाजणार हे सोमवारीच समजणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार माध्यमिक शिक्षक आणि 700 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

यातील शनिवारपर्यंत 5 हजार शिक्षकांची करोना चाचणी झालेली आहे. सोमवारपासून शाळा सुरू करावयाची असल्यास रविवारी एका दिवसात 5 हजार शिक्षकांची करोना चाचणी करावी लागणार असून ही बाब अशक्यच आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाने एका शाळेत दहा शिक्षक असल्यास त्यातील चार शिक्षकांची चाचणी झालेली असल्यास त्यांनीच शाळा सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत.

या ठिकाणी शाळा बंद राहणार

राज्यात मुंबई पाठोपाठ पालघर, पुणे, ठाणे, औरंगाबादने करोनाचा वाढता प्रसार पाहता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी शिक्षण विभागाच्या ऑनलाईन बैठकीत शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्ह्यात टप्प्याने करोनाचा संसर्गाचा अंदाज घेवून शाळा सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्याचा शाळा सुरू करण्याचा निर्णय आज होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या