Friday, April 26, 2024
Homeनाशिकअनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी नोव्हेंबरमध्ये विशेष पंधरवाडा

अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी नोव्हेंबरमध्ये विशेष पंधरवाडा

नाशिक | प्रतिनिधी

सरकारी किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना विविध शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्याचे महिला व बालविकास विभागाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात येत्या १४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष पंधरवडा मोहीम राबवण्यात येणार आहे…

- Advertisement -

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत सरकारी, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांकडे संस्थेतून बाहेर पडताना जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत; तसेच त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.

ही प्रमाणपत्रे गतीने देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, विभागीय पातळीवर विशेष पंधरवडा राबवण्यात येणार आहे. पंधरवडा यशस्वीपणे राबवण्याकरिता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्था आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागाने दिले आहेत.

यादृष्टीने संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

बालक अनाथ असल्याची खात्री जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम नोंदवहीचा दाखला यापैकी एका पुराव्यानुसार करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही संबंधित बालगृह, संस्था, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्ह्याची बाल कल्याण समिती यांनी करून परिपूर्ण प्रस्ताव महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय स्तरावरून पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरित केले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या