Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'या' राज्यांमध्ये डेंग्यूनं चिंता वाढवली, आरोग्य यंत्रणा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

‘या’ राज्यांमध्ये डेंग्यूनं चिंता वाढवली, आरोग्य यंत्रणा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा (Corona Virus) प्रार्दुभाव कमी होत असताना डेंग्यूनं (Dengue) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशातल्या काही राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे.

- Advertisement -

डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य यंत्रणा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आली असून तज्ज्ञांची पथके नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवली आहेत. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ही पथके राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन करतील.

या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी समाविष्ट आहेत. आरोग्य सेवा महासंचालक आणि नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आलं आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला.

डेंग्यू झाल्याचे कसे समजते?

तुमच्या घराजवळ किंवा आवारात पाण्याचे डबके साचले असतील आणि त्यात औषधांची फवारणी झाली नसेल तर तिकडे आवर्जुन डेंग्यू मच्छरांची पैदास होण्याची शक्यता असते. हे डेंग्यू मच्छर तेथूनच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना चावण्यास सुरुवात करतात. डेंग्यूच्या मच्छराने चावल्यास काही दिवसांमध्ये तुम्हाला लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. डेंग्यू मच्छर चावल्यावर ३ किंवा ५ दिवसांत ताप येण्यास सुरुवात होते. ताप आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या इस्पितळात जाऊन लवकरात लवकर उपचार सुरु करावे.

कसा कराल डेंग्यू पासून बचाव?

स्वच्छ किंवा घाण कोणत्याही प्रकारचे पाणी कोणत्याही भांड्यात जमा करून ठेवू नये. कुलरचे पाणी सुद्धा दररोज बदलावे आणि जमल्यास त्यात थोडे केरोसीन टाकावे. पाण्याची टाकी घरात असल्यास ती झाकण लावून बंद करून ठेवावी. खिडक्यांवर घट्ट जाळी किंवा काच लावावी आणि दरवाजे सुद्धा बंद करून ठेवावे जेणेकरून मच्छर घरात येणार नाहीत. जमल्यास मच्छरांपासून बचाव म्हणून मच्छरदानी किंवा स्प्रेचा आवर्जुन वापर करावा. घरात फिश टँक व फुलदाणी असल्यास त्यातील पाणी सुद्धा दर आठवड्याला बदलत राहावे. यासारख्या खबरदारी घेऊन तुम्ही डेंग्यू पासून स्वत:चा बचाव करू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या