Friday, April 26, 2024
Homeनगर‘ढगातील शेती’चा प्रयोग शेतकर्‍यांना प्रेरणादायी - ना. रामदास आठवले

‘ढगातील शेती’चा प्रयोग शेतकर्‍यांना प्रेरणादायी – ना. रामदास आठवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

‘ढगातील शेती’ हा खडकाळ माळ रानावर केलेला प्रयोग शेतकर्‍यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

- Advertisement -

इतर शेतकर्‍यांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

अकोले तालुक्यातील मुथाळने येथील समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर असलेल्या ‘ढगातील शेती’ या विठ्ठल पाडेकर यांच्या शेतातील एका वेगळ्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी व आवळा प्रक्रिया उद्योगाला भेट देण्यासाठी ना. आठवले येथे आले होते. सुमारे 120 एकर क्षेत्रात एवढ्या उंचावर या खडकाळ माळरानावर गेल्या काही वर्षात या परिसराला हिरवेगार केले.

पाणी, रस्ते, वीज अशा अनेक गोष्टी निर्माण करीत इथे आता ऊस, आंबा, पेरू, करवंदे, चिकू, डाळिंब सारखी पिके पाहून ना. आठवले भारावून गेले. यावेळी त्यांचा पाडेकर कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे राज्य सचिव विजय वाकचौरे, तालुका अध्यक्ष शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, वात्सल्य संस्थेचे कल्पित वाकचौरे, काकासाहेब खंदारे, उद्योजक राजेश पाडेकर, ऋषिकेश पाडेकर, मुथाळनेचे माजी सरपंच बबन सदगिर, सरपंच मारुती फोडसे उपस्थित होते.

ना. आठवले म्हणाले, ‘ढगातील शेती’ हा प्रयोग खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांसमोर एक उत्तम उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खडकाळ माळरानावर आज पाडेकरांनी नंदनवन फुलवले आहे. आवळ्यावर प्रक्रिया करून उत्पादना बरोबरच स्वतःची बाजारपेठ निर्माण केली आवळ्यापासून अनेक उत्पादने तयार करून बाजारपेठेत एक ब्रँड तयार केला, हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.

‘ढगातील शेती व आवळा प्रक्रिया’ उद्योगामुळे मुथाळणेचे नाव आज देशभर झाले. याची निश्चितच केंद्राच्या पातळीवर आपण दखल घेऊ. शेतीत अनेक प्रयोग आपण पाहिले पण मुथाळण्याचा प्रयोग हा वेगळा असून अशा शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार नेहमी उभे राहील शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याबरोबरच पारंपरिक शेती करावी. शेतकरी समृद्ध झाला तर खेडी समृद्ध होतील. खेडी समृद्ध झाली तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असे आठवले म्हणाले.

मुथाळणे गावात ना. आठवले यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मदन सदगिर, बंडू सदगिर, दत्तू सदगिर, करू सदगिर, अशोक सदगिर, शंकर सदगिर, संजय फोडसे, दगडू सदगिर, राजेंद्र बोर्‍हाडे आदी उपस्थित होते.

मुथाळणे गावाला 25 लाखांचा निधी

मुथाळणे गावात आपण नेहमी येऊ असे सांगत त्यांनी कविता सादर करीत, गावातील सामाजिक-सांस्कृतिक भवनासाठी खासदार निधीतून 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी गावातील सत्कारप्रसंगी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या