Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

नंदुरबार जिल्हयातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्हयातील सर्व शहर व ग्रामीण भागात असलेल्या जातीवाचक गावे, वस्त्या, रस्त्यांची नावे (Names of villages, settlements, roads) बदलून महापुरुषांची तसेच लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. शहरी भागातील ५४ तर ग्रामीण भागातील १०२ अशा एकुण १५६ वस्त्यांची जातीवाचक नावे (Caste names) बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी दिली.

- Advertisement -

राज्यातील सर्वच शहरी व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नाही. त्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होवून राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.११ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय पारीत केला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हयात दि.६ मे २०२१ रोजी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.

यात समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. तसेच सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हयातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (Panchayat Samiti) तर शहरी भागासाठी नगरपालिका याबाबत कार्यवाही करणार आहे. त्यानुसार विभागीय स्तरावरील कार्यवाही करण्यात आली असून जिल्हास्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये जातीवाचक नावे असणार्‍या गाव, वस्त्या, रस्त्यांच्या नावांची माहिती घेण्यात आली.

या सर्व जातीवाचक नावे असणार्‍या गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची, लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्हयातील नगरपालिका क्षेत्रातील ५४ तर ग्रामीण भागातील १०२ अशा एकुण १५६ जातीवाचक नावे असलेल्या वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात नवापूर शहरातील १३, शहादा शहरातील १४, तळोदा शहरातील २७ अशा ५४ वस्त्यांची नावे बदलण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील ५०, तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील १५ वस्त्यांचा समावेश आहे, अशी माहिती श्री.नांदगावकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या