Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदानपेट्यांवर चोरांची वक्रदृष्टी

दानपेट्यांवर चोरांची वक्रदृष्टी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाड शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या महालक्ष्मी मंदिरातील ( Mahalakshmi Temple) तसेच शहरालगत असलेल्या नागापूरच्या नागेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन मंदिरातील दानपेट्या (donation box) फोडून रक्कम लंपास करण्याच्या या घटनांनी शहरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिराकडे वळविल्याने भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

- Advertisement -

मनमाडपासून चार कि.मी. अंतरावर नागापूर येथे प्राचीन आणि पौराणिक असे महादेवाचे मंदिर असून, त्यात भाविकांची नेहमी गर्दी असते. मंदिराच्या गाभार्‍याजवळ दानपेटी असून दर्शनासाठी येणारे भाविक त्यात दान टाकतात. मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने आत प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडले आणि त्यातील रोख रक्कम चोरून पसार झाला. एक महिन्यापासून दानपेटी उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यात मोठी रक्कम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहे. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या अगोदर देखील चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

दुसर्‍या घटनेत शहरातील मुख्य बाजार पेठेत गवळी समाजाचे महालक्ष्मीमातेचे मंदिर असून मंदिराबाहेर दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहर परिसरात दुचाकी, घरफोडीच्या घटना घडत असतांना आता चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिक स्थळाकडे वळविल्याचे पाहून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या