पिस्तुलसह काडतुस जप्त; दोन तरूणांना अटक

जळगाव : Jalgaon

शहरात १९ वर्षीय तरुण गावठी पिस्तुल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळताच त्याला मानराज पार्कजवळून अटक केली. दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या मित्राकडे या पिस्तुलचे काडतुसे असल्याचे सांगताच दुसर्‍या संशयिताच्या देखील मुसक्या आवळल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील समता नगरातील कार्तिक राजू सुरवाडे (वय-१९) हा तरुण मानराज पार्कजवळ गावठी पिस्तुल कंबरेला खोचून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ भगवान पाटील, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन पाटील यांचे पथक तयार केले.

या पथकाने दुपारी रविवारी ४ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, कार्तिकच्या हालचाली त्यांना संशयास्पद दिसून आल्या. त्यांनी कार्तिकची विचारपूस करीत अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल जमा करीत कार्तिकला अटक केली.

दुसर्‍याकडे आढळले जीवंत काडतुस

पिस्तुलसह कार्तिक सुरवाडे याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. यात त्याने पिस्तुलची काडतुसे हे त्याचा मित्र राहुल घेवरचंद बनबेरु (वय-३०,रा. रायसोनी नगर) याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी राहुलचा शोध घेतला असता राहुल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात असल्याचे पोलिसांना दिसले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्तिक राजू सुरवाडे (वय-१९, रा. समतानगर) व त्याचा मित्र राहुल घेवरचंद बनबेरु (वय-३०,रा. रायसोनी नगर) या दोघांना अटक केली असून त्या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *