Friday, April 26, 2024
Homeनाशिकथाळीनाद आंदोलनाचा इशारा

थाळीनाद आंदोलनाचा इशारा

दे. कॅम्प । वार्ताहर

कॅन्टोन्मेंट सेवकांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियन सेवकांनी काळ्या फिता लावून प्रशासनाचे लक्ष वेधले व पगार वेळेवर न मिळाल्यास थाळीनाद आंदोलन करण्याचा इशार देण्यात आला.

- Advertisement -

यावेळी युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक आणि क्लार्क यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार दिला जात नाही. पगार दर महिन्याच्या 10/15 दिवस उशिरापर्यंत मिळत असल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

काही सेवकांनी बँक व फायनान्स कंपन्यांकडून घरासाठी कर्ज घेतलेले आहे. त्याचा हप्ता वेळेवर न गेल्यामुळे बँक दंड वसूल करते. त्यामुळे सेवकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. तसेच करोनाच्या काळात डॉक्टर्स, नर्स यांनी जिवाची पर्वा न करता देवळालीची व देशाची सेवा केलेली आहे. आरोग्य सेवकांनी आपले दायित्व स्वीकारत सेवा देत आहेत. असे असताना समजत नाही सरकार सेवकांचा पगार उशिरा का करत आहे? तरी सरकारने व कॅन्टोन्मेंटने कामगारांची अडचण लक्षात घेऊन न्याय द्यावा.

यावेळी युनियन उपाध्यक्ष सुरेंद्र मेहोरोलिया, सेक्रेटरी संजीव राजोरा, सदस्य किशोर साळवे, विनोद खरालिया, राजबीर सुमेरा, चित्रा सोनवणे व पेन्शनर लतीफ शेख, रोहिदास शेंडगे, शीला भरोसे, हरिश्चंद्र सारस, जगपाल चांडालिया, विजय बुंदेले, घनश्याम गिल, वामन लोंढे, भरत सारस, केशव बोराडे, केशव शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या