Friday, April 26, 2024
Homeनाशिकऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात

ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात

निफाड। प्रतिनिधी

यावर्षी दिपावलीपुर्वीच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडणी मजुरांच्या आगमनाने गोदाकाठची गावे गजबजली होती. मात्र तब्बल सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आता साखर कारखान्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतांना या ऊसतोडणी मजुरांना देखील घराची ओढ लागली असून अनेक मजुर घराकडे परततांना दिसत आहे.

- Advertisement -

तालुक्यातील गोदाकाठ भागात ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने या परिसरात कोळपेवाडी, प्रवरा, संगमनेर, लोणी, कादवा, द्वारकाधिश या साखर कारखान्याचे ऊसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. पावसाळा, हिवाळा अन् आता उन्हाळा अशा तिनही ऋतुत या कामगारांनी तालुक्यात मुक्काम ठोकला होता. यावर्षी कारखान्यांचा गाळप हंगाम देखील लांबल्याने या मजुरांना दिर्घकाळ थांबावे लागले.

अद्याप देखील निफाड, शिवरे, कोठुरे, शिंगवे, चांदोरी परिसरात ऊसतोडणी सुरू असून कादवा कारखान्याकडून अद्यापही ऊसाची वाहतुक सुरू आहे. या कारखान्यासाठी ऊसतोडणीला आलेले हे मजुर मुख्यत्वे नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, वैजापूर, गंगापूर, भडगाव, पाचोरा आदी तालुक्यातील असल्याने व आता जास्त दिवसांचा कालावधी लोटल्याने या मजुरांना घराची ओढ लागली आहे.

साहजिकच काही मजुर आपल्या बैलगाडीने गावाकडे जातांना दिसु लागले आहेत. ऊसतोडणीसाठी येतांना हे मजुर प्रारंभी कारखान्याकडून उचल घेतात व ऊसतोडणीतून मिळणार्‍या मजुरीतून ही रक्कम फेडत असतात. भल्या पहाटेपासूनच हे मजुर ऊसतोडणीच्या कामात व्यस्त होत असतात. गावी कोरडवाहू शेती असल्याने पावसाच्या भरवश्यावरच पीक. परिणामी कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी हे मजुर कारखाना गाळप हंगामात सहकुटूंब ऊसतोडणीसाठी येत असतात. मात्र आता ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याने व कारखाना गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने हे मजुर गावाकडे परतू लागले असुन गोदाकाठ भागातील रस्त्यावरून या मजुरांच्या बैलगाड्या जातांना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या