Saturday, April 27, 2024
Homeनगरजरे हत्याप्रकरणी न्यायासाठी नगरमध्ये कँडल मार्च

जरे हत्याप्रकरणी न्यायासाठी नगरमध्ये कँडल मार्च

अहमदनगर (प्रतिनिधी) –

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी सायंकाळी नगरमध्ये कँडल मार्च काढण्यात आला.

- Advertisement -

अनेक सामाजिक संस्था या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे फलक त्यांनी हाती घेतले होते. शहराचे आ. संग्राम जगताप यासह विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

जरे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांना सापडलेला नाही. जरे यांच्या कुटुंबियांनीच रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा कँडल मार्च आयोजित केला होता. कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च काढला. 30 नोव्हेंबरला रात्री 8 च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्याची घटना घडली आहे.

या घटनेला काल एक महिना झाला आहे. या मार्चमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडसह, रामरहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, स्टुडंट पॉवर फाउंडेशन, नगर संघर्ष समिती, जनआधार फाउंडेशन, मनसे, नगर सोशल क्लब, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेस, फुले ब्रिगेड, शहर काँग्रेस कमिटी, भिंगार शहर काँग्रेस कमिटी व टिपु सुलतान प्रतिष्ठान आदी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी आ. जगताप म्हणाले की, जरे यांच्या हत्येची घटना निंदनीय आहे. आरोपीला अटक झाली पाहिजे.

याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. असे प्रकार घडू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी केली. स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, जनआधार फाउंडेशनचे प्रकाश पोटे, देविदास खेडकर, नलिनी गायकवाड, रुणाल जर यांचे मनोगत यावेळी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या