Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगकॅन्सरभान

कॅन्सरभान

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 1991 पासून अमेरिकन कर्करोगाच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे 3.8 दशलक्ष कॅन्सर रुग्णांचे जीव वाचवले आहेत. या यशाचे श्रेय लवकरात लवकर कॅन्सरचे ओळखून त्याचे निदान होणे, धूम्रपानाचे प्रमाण कमी करणे आणि कॅन्सर उपचारातील सुधारणा यांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत गांभीर्याने याकडे पाहण्याची गरज आहे.

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी आली आहे. ही बातमी म्हणजे सन 1991 पासून पहिल्यांदाच अमेरिकेतील कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 33 टक्क्यांनी कमी झाले आहे. गेल्या तीन दशकांत कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने आपला कॅन्सरचा अहवाल ‘कॅन्सर जर्नल फॉर क्लिनिसीअन’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध केला. या अहवालानुसार गेल्या तीन दशकांत अमेरिकेत 38 लाख कॅन्सर रुग्णांचा जीव वाचवता आला आहे किंवा त्यांचा पाच वर्षांचा मृत्यूदर कमी करता आला आहे.

नक्की काय आहे अहवालामध्ये?

- Advertisement -

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालात या कमी झालेल्या कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचे श्रेय हे लवकरात लवकर कॅन्सर ओळखणे, धूम्रपानाचे प्रमाण कमी करणे आणि कॅन्सर उपचारातील सुधारणा यांना देण्यात आले आहे. याचबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर ज्या विषाणूमुळे होतो, तो म्हणजे मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) आणि या विषाणूंवर संशोधकांनी शोधलेल्या लसीलासुद्धा तेवढेच श्रेय देण्यात आले आहे. 2012 ते 2019 या काळात गर्भाशयाच्या कॅन्सरच्या दरात 65 टक्के घट झाली होती. याचबरोबर मानवी पॅपिलोमाव्हायरसमुळे इतर कॅन्सरसुद्धा होतात, ज्यामध्ये डोके आणि मानेचे कॅन्सर असो किंवा गुदद्वाराचे कॅन्सर.. त्यामुळे डॉक्टरांना आणि संशोधकांना आशावाद आहे की, या लसीचे महत्त्व फक्त स्त्रियांच्याच कॅन्सरला नाही, तर पुरुषांच्यासुद्धा कॅन्सरसाठी महत्त्व असेल. आश्चर्य म्हणजे 20 ते 24 वयोगटातील या वयोमर्यादेत ज्या स्त्रियांना मानवी पॅपिलोमाव्हायरस (कझत) लस सर्वप्रथम मिळाली होती त्याच स्त्रियांमध्ये 2012 ते 2019 पर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये 65 टक्क्यांची घट झाली होती.

कॅन्सर जनजागृतीचे महत्त्व :

अहवालात अजून एक महत्त्वपूर्ण नोंद केली गेली आहे ती म्हणजे अमेरिकन कॅन्सर मृत्युदर विसाव्या शतकाच्या सर्वच दशकांमध्ये वाढला आहे. मुख्यत्वे धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर धूम्रपानाचे प्रमाण कमी झाल्याने आणि काही कर्करोगांचे लवकर निदान होऊन उपचारांमध्येही सुधारणा झाल्यामुळे, 1991 मध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण त्याच्या शिखरावरून कमी झाले. याच दशकामध्ये कॅन्सर रुग्णांच्या मृत्यूचा वेग हळूहळू कमी झाला आहे. नवीन अहवालात असे आढळून आले की, सर्व कर्करोगांसाठी एकत्रितपणे पाच वर्षांचा सापेक्ष जगण्याचा दर 1970 च्या दशकाच्या मध्यभागी निदानासाठी 49 टक्क्यांवरून 2012-18 मध्ये निदानासाठी 68 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अहवालानुसार, ज्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये आता जगण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ते म्हणजे थायरॉईड 98 टक्के, प्रोस्टेट 97 टक्के, टेस्टिस 95 टक्के आणि मेलेनोमा 94 टक्के. तर स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी सध्याचा जगण्याचा दर सर्वात कमी 12 टक्के आहे. हा जगण्याचा दर वाढण्यामागे धूम्रपान आणि अल्कोहोल याबद्दलची जनजागृती कामी आली आहे. जनजागृतीने अमेरिकन लोकांचे धूम्रपान आणि दारू सेवन कमी करण्यात यश येताना दिसत आहे. याचबरोबर धूम्रपान हे फुफ्फूस, लिव्हर, नाक आणि तोंड यांच्या कॅन्सरला कारणीभूत आहे, हे अमेरिकन नागरिकांना समजून येताना दिसून येत आहे.

भारताची परिस्थिती

दुर्दैवाने भारतमध्ये युरोप-अमेरिकेसारखी कॅन्सरची केंद्रीय संस्था नियमितपणे आपले अहवाल जाहीर करत नसल्यामुळे आपणाला योग्य ती माहिती मिळू शकत नाही. पण नागपूरस्थित एका शासकीय संस्थेच्या अहवालानुसार भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा कॅन्सर रुग्णांचा देश झाला असून अमेरिका आणि चीननंतर भारताचा क्रमांक लागतो आहे. सन 2022 मध्ये भारतात 14 लाख रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये 2025 पर्यंत अजून वार्षिक एक लाखाची वाढ होऊन साधारणपणे 15 लाख रुग्ण आढळून येतील. 2022 मध्ये भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात कॅन्सर झाल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे 7 लाख 50 हजार स्त्रियांचा समावेश होता तर कमी अधिक प्रमाणात सात लाख पुरुषांना कॅन्सर आढळून आला. सध्या भारतात दर एक लाख लोकांमागे 100 लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यामध्ये वाढ होत जाऊन सन 2040 पर्यंत वार्षिक 20 ते 25 लाख लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण दिसून येईल, तर काही निमशासकीय संस्थांच्या अंदाजानुसार वास्तविक घटना नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 1.5 ते 3 पट जास्त आहेत. म्हणजेच आजच्या दिवशी भारतामध्ये अंदाजे 50 लाख कॅन्सरचे रुग्ण असू शकतात. भारतामध्ये कॅन्सर रुग्णांच्या वाढीचा दर हा मुख्यतः जागरुकतेचा अभाव आणि कॅन्सर स्क्रीनिंग कार्यक्रमांच्या कमी उपस्थितीशी निगडीत आहे. तसेच उशिरा टप्प्यामध्ये आढळून येण्यामुळे उच्च रोगाच्या ओझ्याचासुद्धा प्रश्न वाढला आहे. भारतात कॅन्सर दुसर्‍या किंवा तिसर्‍या टप्प्यात शोधण्याचे प्रमाण फक्त 29 टक्के आहे, फक्त 15 टक्के आणि 33 टक्के स्तनाच्या, फुफ्फुसाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान अनुक्रमे एक आणि दोन टप्प्यात होते, जे चीन, यूके आणि यूएसपेक्षा लक्षणियरीत्या कमी आहे.

विकसित आणि विकसनशील देशांमधील विरोधाभास :

कॅन्सर रुग्णांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करायचा झाल्यास विकसित देशांनी यामध्ये खूपच आघाडी घेतली आहे. अमेरिकेत सुमारे सहा दशकांपासून कॅन्सर प्रतिबंध कार्यक्रम केला जात आहे. त्याचजोडीला अमेरिकेत कॅन्सरवरती संशोधन करणार्‍या शेकडो संस्था असून जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये कॅन्सर संशोधन चालते. अमेरिकेत कॅन्सरच्या संशोधनासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. युरोपियन देशांनी यामध्ये आघाडी घेतली असून युरोपमधील सध्याचे कॅन्सरचे प्रमाण निम्म्याने कमी करण्यासाठी योजना कार्यन्वित केली आहे. यामध्ये संशोधक, डॉक्टर आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. इतर विकसित देशांमध्ये जपान, चीन, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांनीसुद्धा कॅन्सरवर संशोधन आणि उपाययोजना यासाठी भरीव कार्यक्रम सुरू केले आहेत. विकसनशील देश यामध्ये खूपच मागे असून त्यामध्ये आफ्रिकन आणि आशियन देशांची कामगिरी खूपच खराब आहे. भारतात सध्या केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कॅन्सर प्रतिबंध कार्यक्रम आखण्याची गरज दिसून येत आहे. त्याचजोडीला भारतामध्ये कॅन्सरवरील संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कोविडनंतर जगातील अनेक विकसित देशांत कॅन्सरवरील लसींच्या संशोधनाला वेग आला असून त्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसेच अमेरिका-युरोपमधून पुढील काही वर्षांत कॅन्सर लसी रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. भारत कॅन्सर लसीच्या संशोधनात खूपच मागे आहे. पुढील काही वर्षांमध्ये यामध्ये काही बदल घडून येताना न दिसल्यास आपणास विकसित देशांनी संशोधित केलेल्या लसी विकत घेण्याची वेळ येईल.

(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या