Friday, April 26, 2024
Homeनाशिकनांदूरमध्यमेश्वर धरणाच्या जलद कालव्याला पाणी

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या जलद कालव्याला पाणी

निफाड । Niphad

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या जलद कालव्याला गुरुवार दि.8 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभी 300 क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने हा कालवा 1 हजार क्युसेसचा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या कालव्याचे आवर्तन 15 दिवसांचे असून नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांना देखील उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन 14 एप्रिल रोजी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्याची तहान भागविण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणातून 128 कि.मी. लांबीच्या जलद कालव्याची निर्मिती करण्यात येवून त्यावेळी नांदूरमध्यमेश्वर धरणातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी या जलद कालव्याद्वारे देण्याचे निश्चित केले होते.

परिणामी पहिले दोन-चार वर्ष या कालव्याला पावसाळ्यातच पाणी सोडले जात असे. मात्र त्यानंतर मराठवाड्यातील नागरिकांनी उन्हाळ्यातही पाण्याची मागणी करीत त्यासाठी आंदोलने केली. परिणामी एक पाणी उन्हाळ्यात देण्याचे ठरले. मात्र आता या कालव्याला बाराही महिने पाणी सोडले जावू लागले. साहजिकच या कालव्याच्या पाण्यासाठी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या पाण्यात कपात करण्यात आली.

आजच्या परिस्थितीत तर धरणात अनेक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी खोदण्यात आल्या असून ज्या गावचे धरण त्याच गावाला मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरसाठी धरणातून पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या जलद कालव्याला गुरुवार दि.8 रोजी 300 क्युसेस पाणी सोडण्यात आले असून आजपासून या कालव्याची वहन क्षमता वाढविण्यात येवून ती 1 हजार क्युसेस करण्यात येणार आहे. तर उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन म्हणून धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांना 14 एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार असून हे दोन्ही कालवे 15 दिवस चालणार आहे. कालव्यांना पाणी सोडल्यानंतर जळू पाहणार्‍या पिकांना देखील जीवदान मिळणार आहे.

चार्‍या झाल्या नामशेष

सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाचे वतीने धरणाच्या या दोन्ही कालव्यांना चार्‍याची निर्मिती केली होती. प्रारंभी शेतकरी पाणी अर्ज भरून चार्‍याद्वारे कालव्याचे पाणी शेतीसाठी वापरत असत. परंतू गेल्या काही वर्षापासून शेतकरी पाणी अर्ज भरत नसल्याने या चार्‍यांना पाणी सोडणे बंद झाले. साहजिकच आजच्या परिस्थितीत चार्‍यांचे अस्तित्व देखील शिल्लक राहिले नाही. शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी न नोंदविल्यास भविष्यात सिंचनासाठी पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या