घड्याळ खरेदीची कलम 83 नुसार चौकशीचा विरोधकांचा दावा

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या गाजत असलेल्या घड्याळ खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ व संतोष खामकर यांनी जिल्हा उपनिबधकांकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने बँकेतील घड्याळ खरेदीची कलम 83 अंतर्गत चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

दरम्यान, बँकेचा कारभार सभासद हिताचा व काटकसरीचा आहे. परंतु विरोधकांना राजकारणाच्या हव्यासापोटी शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी प्रकरणात मोठा घोटाळा झाला, असे वृत्त प्रसिध्द करत सहकार खात्याकडे तक्रारी करून बँकेची व सभासदांची बदनामी केली, हे चौकशी अहवालावरून सिद्ध झाले असल्याचे बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण यांनी सांगितले.

सहकार खात्याने बँकेच्या घड्याळ खरेदीच्या चौकशीसाठी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली होती. त्यानंतर सुनावण्या होवून संचालक मंडळाने आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला याचे तक्रारदारांनी सहकार खात्याला कागदपत्रे सादर केली होती. त्यानूसार चौकशी अधिकारी यांनी सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 अंतर्गत चौकशी करण्याबाबत शिफारस केलेली असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

तर शिक्षक बँकेचे सभासदांना शताब्दी वर्षानिमित्त घड्याळ भेटीचे वितरण अद्यापही सुरू आहे. चौकशीच्या वेळेस शिल्लक असलेल्या घड्याळांची संख्या आता 1 हजार 200 च्या आसपास शिल्लक आहेत. करोना महामारीमुळे वर्षभरापासून अनेक सभासद बँकेत आले नाही. यामुळे घड्याळ वाटप अद्याप चालू आहे. अकरा हजार सभासदांपैकी बहुतांश सभासदांनी घड्याळ नेले आहे. त्यांनी कुठेही तक्रार केलेली नाही. घड्याळाची खरेदी प्रक्रिया सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पूर्ण केलेली आहे. घड्याळ खरेदीस सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ही बाब चौकशी समितीने अधोरेखित केली आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारणासाठी घड्याळाचा महाघोटाळा केला, मात्र, हा फुसका बार निघाला, हे आता सिद्ध झाले आहे, असे माजी चेअरमन संतोष दुसुंगे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *