Friday, April 26, 2024
Homeनगरबुरूडगावच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

बुरूडगावच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुरुडगाव रोडवरील मनपाच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या उभारणीबाबत झालेल्या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत नगर विकास विभागाकडून अहवाल मागवला आहे. नगर विकास विभागानेही पुन्हा महापालिकेकडून याचा अहवाल मागवला असून, 25 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

शाळेचे आरक्षण असतानाही बुरुडगाव रोडवरील जागेवर महापालिकेने नवीन रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित केली आहे. ज्या रुग्णालयासाठी निधी दिला होता, त्यासाठी न वापरता इतरत्र निधीचा गैरावापर केला जात असल्याची तक्रार लोक कार्य आणि लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. शासनाने याची दखल घेत महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मनपाकडून अहवाल सादर न झाल्याने व तक्रारीवर नगर विकास विभागाकडून सुनावणी न घेण्यात आल्याने ढगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मनपाने अहवाल सादर केला.

मात्र, योग्य अहवाल सादर न झाल्याने ढगे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. जिल्हा नियोजन मंडळामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून बुरुडगाव रोड येथील महापालिकेच्या जागेत रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी देण्यात आलेला निधी या कामासाठी वळवण्यात आलेला आहे.

मात्र, ज्या जागेवर रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे, त्या जागेवर प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. त्यामुळे सदरचे काम थांबवावे, अशी मागणी ढगे यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाकडून अहवाल मागवला आहे. नगर विकास विभागानेही मनपा आयुक्तांना पत्र पाठवून पुन्हा 25 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या