Thursday, April 25, 2024
Homeनगर15 दिवसांपासून बुर्‍हाणनगर पाणी योजना बंद

15 दिवसांपासून बुर्‍हाणनगर पाणी योजना बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुर्‍हाणनगरसह 44 गावांची पाणी योजना गेल्या 15 दिवसांपासून बंद असतानाही पाणी पुरवठ्याच्या अधिकार्‍यांना याचा साधा थांगपत्ताही नाही. सोमवारी नागरिकांची ओरड झाल्यानंतर व काही माजी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर सीईओंच्या आदेशाने पाणीपुरवठा अभियंत्यांनी पळापळ करून योजना दुरूस्त केली. तरीही प्रत्यक्ष पाणी येण्यास अजून किती दिवस लागतील, याचा अंदाज नाही.

- Advertisement -

बुर्‍हाणनगर पाणी योजनेत नगर तालुक्यातील 38, तर राहुरी तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या या पाणीयोजनेवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. मात्र ही योजना झाल्यापासून वारंवार बंद पडत आहे. कधी वीजबिल थकले म्हणून, तर कधी जलवाहिनी फुटली म्हणून. सलग महिना-दोन महिने योजना विनासंकट चालली असे झालेले नाही. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, तसेच त्यांच्या विभागातील इतर कर्मचार्‍यांवर ही योजना सुरळीत चालवण्याची नैतिक जबाबदारी आहे.

मात्र योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या ठेकेदाराकडून किंवा इतर अधिकार्‍यांकडून अभियंत्यांना अंधारात ठेवले जाते की अधिकारी मुद्दामहून योजनेकडे कानाडोळा करतात, हे न उमगणारे कोडे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेवरील गावांना थेट 15 दिवसांतून एकदा पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थही पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात. महिन्यातून एक-दोनदाच पाणी येत असेल तर पाणीपट्टी कशाला भरायची, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातो. आताही गेल्या 15 दिवसांपासून योजना बंद होती.

लाईन फुटली आहे, असे सांगून पहिले सात दिवस ढकलले गेले. मात्र दुरूस्तीबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. नंतरचे सात दिवसही असेच गेले. दरम्यान, दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे यांनी आंदोलनाचा इशारा देऊन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली. माध्यमांनीही आवाज उठवला. सोमवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, सदस्य संदेश कार्ले आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना भेटून योजना बंद असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी तातडीने पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आनंद रूपनर व बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी यांना योजनेची माहिती घेण्यास सांगितले. तेव्हा हे दोन अधिकारी दुरूस्तीच्या कामासाठी फिल्डवर गेले. तोपर्यंत या अधिकार्‍यांना योजना कधीपासून व कशामुळे बंद आहे, हेही माहीत नव्हते.

- Advertisment -

ताज्या बातम्या