Wednesday, April 24, 2024
Homeनगरशोरूमच्या आवारात बुलेट पेटविणार्‍या तरूणासह 12 जणांविरूद्ध गुन्हा

शोरूमच्या आवारात बुलेट पेटविणार्‍या तरूणासह 12 जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

तांत्रिक बिघाडाची कोणतीही माहिती न देता शोरूमच्या आवारात पेट्रोल टाकून बुलेट (क्र. एमएच 17 सीएल 8055) पेटविणार्‍या

- Advertisement -

सोहेल तांबोळी (रा. शेवगाव) विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मदत करणारे इतर 10 ते 12 जणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

7 जानेवारीला सावेडीतील बुलेट शोरूमच्या आवारात घडलेल्या या घटनेचा गुन्हा तब्बल 10 दिवसांनी दाखल झाला. पोलिसांनीच फिर्यादी होत हा गुन्हा नोंदविला. पोलीस शिपाई संतोष मगर यांनी फिर्याद दिली आहे. बुलेटवर ज्वलंनशील पदार्थ टाकून ती पेटविल्याची क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. तोफखाना पोलिसांनी गोपनीय पध्दतीने या प्रकाराचा छडा लावत गुन्हा दाखल केला आहे.

बॅटरी खराब झाल्याने बुलेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सोहेल तांबोळी याने बुलेट सावेडीच्या शोरूममध्ये आणली. मॅनेजरला कोणतीही माहिती न देता पार्किंगमध्ये बुलेटवर पेट्रोल टाकून ती पेटविली. त्याच्यासह इतर 10-12 जणांनी गोंधळ घालून तेथून निघून गेले. पेटविलेल्या दुचाकी शेजारी शोरूमच्या नव्या कोर्‍या बुलेट उभ्या होत्या.

बुलेटला लागलेली आग इतरत्र पसरून इतर दुचाकीही जळून मोठी वित्तहानी तसेच जिवीतहानी होऊ शकते याची जाणीव असतानाही सोहेल तांबोळी याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बुलेट पेटविण्यासाठी सोहेल तांबोळी यास इतर 10-12 अनोळखी व्यक्तींनी मदत केली. त्यामुळे तांबोळीसह इतर 12 जणांविरोधात पोलिसांनी भादवि कलम 143, 147 आणि 435 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

म्हणून दुर्घटना टळली

घटना घडली त्यावेळी शोरूमचे मालक तेथे नव्हते. मॅनेजर तेथे होते. मात्र मॅनेजरला कोणतीच माहिती न देता तांबोळी याने बुलेट पेटवून दिली. बुलेट पेटल्यानंतर शोरूमच्या कामगारांनी तातडीने अग्नीशमन फवारा मारत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालकाने फिर्याद देण्यास टाळले तरी पोलिसांनी स्वत:च दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या