Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबल्क ड्रग पार्कही गुजरातने पळविला - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दावा

बल्क ड्रग पार्कही गुजरातने पळविला – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

वेदांत-फॉक्सकॉनच्या (Vedanta-Foxconn) पावणेदोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्प पाठोपाठ आता रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प (Drug Park Project)गुजरातला होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ७० ते ८० हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र खोके सरकरमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत. महाराष्ट्राला हा आता दुसरा धक्का आहे, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray)यांनी बुधवारी केला.

- Advertisement -

आधी बेकायदेशीर सरकारने ४० आमदार गुजरातला नेले होते.आता दोन प्रकल्पही नेले असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गद्दारानी सरकार पडल्याने वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप करताना ठाकरे यांनी राज्य सरकारने एअर बस या प्रकल्पाचा पाठपुरवा करावा. आता नवरात्र येणार आहे. नवरात्रीत मंडळांना भेटी देण्यासाठी गरागरा फिरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी कामाला वेळ द्यावा, असा टोलाही लगावला.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सरकारने सर्व सवलती देऊ केल्या होत्या. मात्र आधीचे सरकार दोन वर्षे प्रतिसाद देण्यास अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उदयोगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले असून महाराष्ट्राला यापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन पंतप्रधानानी दिल्याचा दावा सामंत यांनी केला.

वेदांत-फॉक्सकॉनवरून आता राज्यातील राजकारण पेटले आहे. आदित्य ठाकरे तसेच आघाडी सरकारमधील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. तर प्रकलप गुजरातला गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारकडून आघाडीवरच फोडण्यात येत आहे.

महाराष्ट्राला दुसरा धक्का- आदित्य ठाकरे

रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला होणार आहे. प्रकल्प पळवले जात आहेत कारण या सरकारचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क गुजरातला गेलाय हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? ८० हजार आणि ते वेदांता प्रकल्पातून निर्माण होणारे दीड लाख रोजगार गेले त्याला जबाबदार कोण? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

अन्यथा मुखवटे फाटतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मागील दोन वर्षांत कोणाचे सरकार होते. त्या सरकारची मानसिकता काय होती. कोण निर्णय घेत होते हे सगळयांना माहिती आहे. याला जबाबदार कोण हे देखील सगळयांना माहिती आहे. खरे तर महाविकास आघाडीनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला या प्रकरणी राजकारण करायचे नाही. कोणी करण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा त्यांचेच मुखवटे फाटतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तळेगाव मध्ये ११०० एकर जमीन आम्ही प्रकलपाला देऊ केली होती. ३५ हजार कोटींच्या सवलती देखील देऊ केल्या होत्या. पण गेली दोन वर्षे जो प्रतिसाद सरकारकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही,असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

यापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन- उदयोगमंत्री उदय सामंत

वेदांत प्रकल्प गुजरातला गेला याचे दुख आम्हाला आहेच पण आघाडी सरकारनेच या प्रकरणी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे उदयोगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.या कंपनीने ५ जानेवारी २०२२ रोजीच राज्य सरकारला पत्र पाठविले होते. आम्हाला कोणत्या सवलती देण्यात येणार याची माहिती त्यांनी मागवली होती. सहा महिने आघाडी सरकारच्या हातात होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ सादरीकरणही घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांच्याशी भेटून चर्चाही केली. ३८ हजार कोटींच्या सवलती देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षांत केवळ भेटीगाठी घेण्यात आल्या, अशी टीका सामंत यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केली आहे. आता ज्या त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे प्रकल्प गेला.ते झाले ते होऊन गेले. पण महाराष्ट्राला आपण यापेक्षाही मोठा प्रकल्प निश्चित देऊ .महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे याची काळजी केंद्राला असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे सामंत म्हणाले. पुढच्या आठ-दहा दिवसांत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच आमचा विभाग पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा : शेलार

फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन आघाडी सरकारने आणि उद्योग मंत्र्यांनी किती बैठका घेतल्या ? हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून आघाडी सरकारने त्या काळात काय प्रयत्न केले? याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या