Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याइमारती उभारल्या; पण सुविधांचे काय?

इमारती उभारल्या; पण सुविधांचे काय?

पंचवटी । कल्पेश अहिरे Panchavati

नाशिक शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांची आरोग्य स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने( NMC) देखील दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centers ) सुरू करण्यावर शासनाच्या आदेशानुसार भर दिलेला असला तरी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आढळून येत आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील पंचवटी विभाग झपाट्याने विकसित होत आहे. पंचवटी कारंजापासून मखमलाबाद (Makhmalabad )गावापर्यंत तिथून म्हसरूळ गावापासून आडगावपर्यंत, नांदूर गावापासून आडगाव नाक्यापर्यंत असा मोठा विस्तार झालेला आहे. त्यामानाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या अपुरी आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि उपचारासाठी त्यांच्या खिशातील खर्च कमी करणे, विद्यमान आरोग्य सेवा वितरण प्रणाली मजबूत करून सर्वसामान्य लोकांना लक्ष्य बनवून शहरी विकास मंत्रालयाद्वारे लागू केलेल्या पिण्याचे पाणी, स्वच्छता, शालेय शिक्षण इत्यादी आरोग्याच्या व्यापक निर्धारकांची संबंधित विविध योजनांची जुळवून हे साध्य केले पाहिजे. तसेच गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन, मानव संसाधन विकास आणि महिला बालविकास साध्य करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज आहे.

पंचवटीतील पंचवटी कारंजा येथील इंदिरा गांधी प्राथमिक रुग्णालय त्याचबरोबर दिंडोरी रोडवरील फुलेनगर येथील पूर्वीचे मायको नावाने प्रसिद्ध असलेले आणि सध्या सावित्रीबाई फुले आरोग्यवर्धिनी नावाने कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, हिरावाडी साईनगर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्वर्गीय सचिन शिंदे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा विचार करता पंचवटीतील लोकसंख्येच्या मानाने खूपच अपुरे पडत आहेत. परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना प्राथमिक उपचार सहज व लवकर घेता यावे, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करून वेळोवेळी उपचार देण्याबाबत सूचना देखील केल्या आहेत.

परंतु सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना मात्र अनेक वेळा तिष्ठत बसावे लागते. त्याचबरोबर लसीकरण गरोदर मातांचे तपासणीचे वेळापत्रक लक्षात ठेवून अपुर्‍या मनुष्यबळाबरोबर सामना करत उपचार घ्यावे लागत आहेत.

फुले नगरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुस्थितीत आहे, परंतु पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मात्र दोन महिन्यांपासून उपलब्ध नाहीत, अनेक माता-भगिनी या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सकाळपासून उपस्थित असतात. परंतु स्त्रीरोग तज्ज्ञ एकच उपलब्ध असल्याने अनेक महिलांना बराच वेळ थांबावे लागते. उपलब्ध आरोग्य अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने गरोदर मातांची देखभाल व उपचार करीत आहेत. याबाबत गरोदर मातांनी समाधान व्यक्त केले आहे. असे असले तरी दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची व अनेक सहकारी नर्सची गरज असून देखील या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिरावाडी परिसरातील साईनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी वारंवार होत असून, सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. या ठिकाणी देखील वैद्य अधिक वैद्यकीय अधिकारी पुरेसे नाहीत त्याचबरोबर सोबत काम करणार्‍या नर्स व आशा सेविका देखील कमी आहेत. वैद्यकीय सुविधांबाबत स्थानिक नागरिकांशी आणि रुग्णांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वेळोवेळी उपचार करून मिळत असतात.

जर या ठिकाणी पुरेसा स्टाफ ची व्यवस्था केली तर निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही. पंचवटीकरांसाठी सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या अनेक योजना चा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नाशिक महानगरपालिका प्रशासनाने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्यामार्फत नेमणूक करण्यात आलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत स्थानिक आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

नाशिक महानगरपालिका प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती उभ्या करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत, परंतु पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक न केल्याने अनेक रुग्णांना सुविधा असूनही त्यांचा लाभ घेता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेसे मनुष्यबळ नेमावे.

सतीश कापडणीस

- Advertisment -

ताज्या बातम्या