बौध्द गुंफा व ध्यानाची ठिकाणे

अंजली राजाध्यक्ष

तिबेट एकेकाळी स्वतंत्र देश होता. त्याचा काही भाग सध्या चीनच्या अधिपत्याखाली, तर काही भारताच्या अधिपत्याखाली. त्यांचे धर्मगुरू दलाई लामा व त्यांचे शिष्य यांना भारतात धरमशाला येथे राजाश्रय आहे. हिमाचल प्रदेशाचा काही भाग तिबेटच्या सीमेलगत आहे..चित्कूल या शेवटच्या भारतीय गावानंतर चीनची हद्द सुरू होते. तिबेटच्या बौद्ध धर्माचा प्रभाव येथील उंचीवर पठारी भागात वसलेल्या लोकांवर आहे. स्पितीला जाताना खुप बौद्ध मॉनेस्टरीज पहायला मिळतात.

कामरू, कल्पामधील बौद्ध गुंफा, नाको येथील मॉनेस्टरी, टाबो येथील भव्य मॉनेस्टरी व डोंगरात खोदलेल्या बौद्ध गुंफा ( या मात्र आम्ही दूरूनच पाहिल्या, कारण हाताशी फार वेळ नव्हता). टाबो मॉनेस्टरीने डोळे दिपले व बायबल पूर्व काळातील मोझेसने इजिप्तमध्ये बांधलेले गोशन शहर आठवले. टाबो ही सर्वात जुनी मॉनेस्टरी म्हटली जाते. येथे जुनी चित्रे, पुतळे व जवळपास हजार वर्षे जुनी हस्तलिखिते पहायला मिळतात. पुढे धनकर मॉनेस्टरी, ( धनकर हे स्पिती व्हॅलीचे जुने राजधानीचे ठिकाण साडेतीन हजार फूटांवरचे व टाबो व काझा या मध्ये वसलेले) काझा मॉनेस्टरी, किब्बर मधील की मॉनेस्टरी एवढे पाहिले.

गियू नाला येथील साडेसातशे वर्ष जुनी एका बौद्ध भिक्षुकाची ममी पाहिली. बसलेल्या स्थितीत ध्यान करीत त्याने डोळे मिटले. परंतू ते शरीर आजही ममी च्या रूपात पहायला मिळते. किब्बर खेड्यातील उंचीवरील पोस्ट ऑफिस समोर बुद्धाचा मोठा पुतळा पाहिला. दलाई लामांचा जुना निवास पाहिला. सर्व मॉनेस्टरीज उंचावर बांधलेल्या आहेत. काही ठिकाणी पायर्‍या तर काही ठिकाणी दगडगोट्यांवरून सरकत हळूहळू वर चढायचे. नाको येथील मॉनेस्टरी तशी होती. एक चक्क गावात होती व चक्रव्यूहाप्रमाणे शोधत तेथवर जायचे. आमच्यापैकी अनेक जण जाता येता फसले. पण दर्शन झाले. गर्भगृहात कमालीची शांतता असते. बुद्धाची मोठी प्रतिमा आत असते व त्यांच्या स्थानिक भाषेत पुजारी देवास आळवत असतात. अनेक मॉनेस्टरीच्या बाहेर फिरणारी चक्रे पाहिली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *