अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे.

त्यानुसार पहिल्या फेरीसाठी गुरुवार ३ डिसेंबरपासून अर्जामध्ये पर्याय निवडायचे आहेत. तर, अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता बुधवारी २ डिसेंबरला जाहीर होईल, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

सीईटी सेलने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी वेळापत्रकाची वाट पाहत होते.

सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

त्यानंतर बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी ३ ते १० डिसेंबर या दरम्यान आवडणाऱ्या कॉलेजांचे पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर प्रवेशासाठी निवड यादी १२ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेनंतर जाहीर होईल.

या निवड यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते २१ डिसेंबर दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे; तसेच रीटेन्शन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बीपीटीएच आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी नवे कॉलेज प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. त्याची माहिती

www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. राज्यातील विद्यार्थी एमबीबीएस आणि बीडीएस अशा पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची पहिली पसंती असते. मात्र, दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता कमी असल्याने, इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही.

अशा परिस्थितीत विद्यार्थी बीएचएमएस, बीएएमएस अशा अभ्यासक्रमांसोबतच बीएसस्सी नर्सिंगसाठी प्राधान्य देतात. त्यामुळे कमी रँक असणारे राज्यातील आणि परराज्यातील विद्यार्थी या अभ्यासक्रमांची वाट पाहतात. प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *