Friday, April 26, 2024
Homeनगरभाऊबंदकीच्या वादातून देवळाली प्रवरा मुसमाडेवस्ती शाळेचा रस्ता बंद

भाऊबंदकीच्या वादातून देवळाली प्रवरा मुसमाडेवस्ती शाळेचा रस्ता बंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

देवळाली प्रवरा येथिल दोन भाऊबंदकीच्या वादातून मुसमाडे वस्ती येथिल जिल्हा परिषद मराठी शाळेचा रस्ता बंद केल्याने मराठी शाळेतील मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. हा वाद जिल्हाधिकारी यांच्या दालना पर्यंत पोहचला असला तरी वादावर तोडगा निघाला नसल्याने दोन वर्षानंतर शाळा सुरू झाली असली तरी चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र शाळेत जाता न आल्याने चिमुकले विद्यार्थी दुःखद अंत:करणाने पालकांसमवेत घरी परतले.

- Advertisement -

देवळाली-प्रवरा नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मुसमाडे वस्ती येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी वस्ती शाळा असून ही शाळा अभ्यासक्रम व इतर स्पर्धांमध्ये जिल्ह्यात अग्रभागी राहत असल्याने नावारुपाला आलेली शाळा म्हणून पाहिले जाते. शाळेत सध्या 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या चार पाच वर्षांपुर्वी या शाळेचा रस्ता भाऊबंदकीच्या वादातून बंद करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक पुढारी व पालक यांनी दोन्ही भाऊबंदाचा समेट घडवून रस्ता मोकळा करून घेतला होता.

यावेळी मात्र करोना काळात शाळा बंद असताना दोन भाऊबंदात वाद झाल्याने यातील एका भाऊबंदाने आक्रमक पवित्रा घेत शाळेच्या रस्त्यावर लाकडे, दगड, काट्या टाकून बंद करण्यात आला. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने शाळेतील मुले रस्त्यावर येऊन थांबली. शाळेत जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने शिक्षक वर्ग आल्यावर विद्यार्थ्यांनी रडण्यास सुरूवात केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धीर देत रस्ता चालू होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील असे सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदावर विरजण पडल्याने दुःखद अंत:करणाने विद्यार्थी पालकांसमवेत घरी परतले.

याबाबत पालक, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणधिकारी, तहसीलदार आदींना निवेदन देऊन शाळेचा रस्ता पूर्ववत चालू करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत केंद्र प्रमुख के.पी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शाळेचा रस्ता बंद केला असल्यामुळे शाळा बंद आहे. परंतु मला रस्ता कोणी बंद केला? का बंद केला? याची कल्पना नाही.तुम्ही त्या शाळेतील शिक्षक किंवा पालकांशी संपर्क साधावा.

गट शिक्षणधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुसमाडे वस्ती येथील शाळेचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.तहसीलदार एफ.आर.शेख शुक्रवारी शाळेच्या रस्त्याची पाहणी करणार होते.परंतु त्यांनी पाहणी केली की नाही, याची माहिती नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

शाळेचा रस्ता बंद केलेल्या माधव मुसमाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शाळेचा गट नंबर वेगळा असून सदरचा रस्ता माझ्या शेतात जाण्यासाठी आहे. तो पूर्णपणे खाजगी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. माझ्या बाजुचे गवत काढण्यात आले आहे. दुसर्‍या बाजुने गवत काढत असताना त्या बाजुच्या शेतमालकाने वाद उपस्थित केले. या रस्त्यावरून कायमच वाद उपस्थित केला जातो. त्यामुळे मी माझा खाजगी रस्ता बंद केला आहे. शाळेचा स्वतंत्र गट व सर्व्हे नंबर असल्याने त्या गटातून अथवा सर्व्हे नंबर मधून रस्ता तयार करावा, असे माधव मुसमाडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर सुनील जुंदरे, मनीषा लांडे, मधुकर कडू, कल्याणी मुसमाडे, बद्रीनाथ जाधव, नरेंद्र कदम, संदीप कराळे, शंकर मुसमाडे, हरिभाऊ मुसमाडे, अभिजित मुसमाडे, सुनिता तोडमल, मच्छींद्र मुसमाडे, नानासाहेब मुसमाडे, शब्बीर शेख, मुरलीधर मुसमाडे आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या