Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedशोध सामर्थ्याचा : रंगमंचावरील सोज्वळ चेहरा : मंजुषा भिडे

शोध सामर्थ्याचा : रंगमंचावरील सोज्वळ चेहरा : मंजुषा भिडे

आज शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील तरूणाईतही टॅलेन्ट (Talent) दिसून येते. नवे कलाकार (Artist) निर्माण होण्यासाठी आपण तरूण पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आपण त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे अनेक तरूण आवड असून मागे राहतांना दिसतात. असे असले तरी त्यांना नाटक समजण्यासाठी विविध ठिकाणी नाटयप्रयोग करून नाटयप्रयोगांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेष्ठ रंगकर्मी मंजुषा भिडे (Rangkarmi Manjusha Bhide) आपले अनुभव सांगत होत्या.

स्त्री निडर असलीच पाहिजे ! उत्तम अभिनयाची क्षमता असूनही सासरी गेल्यावर अनेक मुली अभिनयापासून दूर गेल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी महिलांनी ठामपणा दाखवावा, बंडखोर व्हा. आवड जोपासणार हे ठामपणे घरातल्यांना सांगायला हवे. कारण आज समानतेचे युग आहे. माझ्यावर विश्वास ठेवा हे ठामपणे सांगता आले पाहिजे. बाहेरच्या जगात वावरतांना स्त्रीला निडरता आली पाहिजे, आपले म्हणणे मांडणे जमले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला विरोध, नकार देता आला पाहिजे, अन्याया विरोधात आवाज उठवता आला पाहिजे.

मंजुषा भिडे, एक हरहुन्नरी गुणवंत रंगकर्मी. रौप्यपदकांपासून अभिनयाची अनेक पारितोषिके विविध नाटकातून भूमिका साकारत असतांना सहजपणे खिशात घातलेली असली तरी अजून खूप काही करायचे आहे म्हणत सतत धडपडणारी प्रयोगशील अभिनेत्री. लग्नापूर्वीचे आयुष्य अकोल्यात गेले. नाटकाची जन्मजात आवड. शालेय जीवनात आठवीत असतांना रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले आणि नंतर मागे पाहिलेच नाही.

- Advertisement -

(Akola) अकोल्याच्या रूपायतन या नाटयसंस्थेमार्फत राज्य नाटयस्पर्धेसाठी मुंबईची माणसं, संध्याछाया, डार्लींग डार्लींग सारख्या नाटकातून दमदार भूमिका करत अभिनयाची पारितोषिके पटकावली. 1995 मध्ये लग्नानंतर (jalgaon) जळगावला आल्यावर समरगीतांच्या माध्यमातून जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात पदार्पण केले आणि विविध संस्थांच्या माध्यमातून नाटकात भूमिका करण्याचा त्यांचा सिलसिला सुरू राहिला. नियोग गाथा, त्याची गोष्ट, नरक्लिबं, मी कोण? टी वेटींग रूम, अरे सहकार सहकार अशी नाटके करतांना अभिनय अधिकाधिक प्रगल्भ होत गेला आणि सहभाग घेतलेल्या प्रत्येक नाटकासोबत त्यांचे अभिनयाचे पारितोषिक, रौप्यपदक हे हमखास ठरलेले असे. परिवर्तन सोबत अपूर्णांकचे महाराष्ट्रभर 50 प्रयोग केले.

ती आई होती म्हणूनच (maharastra) महाराष्ट्रभर प्रयोग केले. ती आणि मी या पुस्तकाचे नाटय रूपांतर देखील रंगभूमीवर सादर करतांना मंजुषा भिडे यांनी आपली अभिनयाची सहजपणे उंची दाखवली.

गेल्या काही वर्षांपासून मंजुषा भिडे या परिवर्तन या जळगावातील प्रयोगशील संस्थेबरोबर जोडल्या गेल्या आहेत. या संस्थे मार्फत सादर केले जाणारे विविध उपक्रम, त्यांचे सूत्रसंचालन, अभिवाचन, सांगितिक कार्यक्रमांची सहभागासह दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. 2016 पासून लहान मुलांचे अभिवाचन बसवून घेणे, दिग्दर्शन करणे, स्त्रीयांना घेऊन स्त्रियांच्या विषयावर अभिवाचन करणे सुरू केले.

त्यातून त्यांनी अनेक उत्तम कलाकृतींना हात घातला.त्यात सहभागी होणार्‍या महिलांना त्या उत्तम अभिनय करू शकतात याची जाणीव निर्माण करून दिली. विषय अलवारपणे मांडणारा गुलजार हा त्यांचा आवडता दिग्दर्शक. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट मंजुषा भिडेंनी गंभीरपणे पाहिले. विषय त्यांना भावले. त्या चित्रपटांचे निरिक्षण, त्यातील कलाकारंकडून सादर होणारा अंगीभूत अभिनय त्यांना भावून त्या दिग्दर्शनाकडे वळल्या. कोणतेही नाटक हाती घेतले की त्या नाटकाचा विषय लक्षात घ्यावा लागतो, त्याची पार्श्वभूमी समजावून घेणे गरजेचे असते, त्या विषयाच्या अनुषंगाने विविध पुस्तकांचे वाचन करणे महत्वाचे ठरते. या प्रक्रियेतून त्या प्रगल्भ होत गेल्या. त्यातून दिग्दर्शन शिकत गेल्या. नव्या संहितेवर काम करणे त्यांना आवडते, कारण नव्या संकल्पना राबवता येतात, मांडता येतात असे त्या सांगतात.

परिवर्तन सतत नव्या कलावंतांच्या शोधात असते. येणारी मुले त्यांची शिकण्याची, कामाची पध्दत या बद्दल आपले अनुभव, निरीक्षण मांडतांना मंजुषा म्हणतात, आज नाटकाकडे वळणारी मुले त्यांना एक्सपोजर मिळाला की इकडे धावतांना दिसतात. ते कायम या क्षेत्रात टिकतील असे नाही. त्यामुळे दर दोन वर्षांनी नवी मुले शोधावी लागतात. आजची नवी पिढी खूप शार्प आहे. तांत्रिक बाजू आम्हाला शिकायला वेळ लागला पण ते सहज शिकतात. यांच्या अभिनयात मॅकेनिझम जाणवतो. असे असले तरी यांना मोल्ड केले तर ती मोल्ड होऊ शकतात. नव्या पिढीच्या कलाने घेतले तर गांभिर्याने, जागरूकतेने ती काम करते. आम्ही सांगतो तुम्ही ऐका हे त्यांना मान्य नाही. त्यांच्या कलाने घेतले तर ती ऐकून घेतात. नवे कलाकार निर्माण होण्यासाठी आपण तरूण पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आपण पोहचू शकत नसल्याची खंत त्या व्यक्त करतात.

मुलींबाबत बोलतांना मंजुषा भिडे सांगतात, महाविद्यालयात असतांना मुली नाट्याकडे, अभिनयाकडे वळलेल्या असतात. पण कॉलेज सोडल्यानंतर त्या अभिनयाच्या क्षेत्रात राहतांना दिसत नाहीत. वयाच्या पंचविशी नंतर मुलींची लग्न होतात, त्या गाव सोडून जातात. सासरी गेल्यावर त्यांच्यावर विविध जबाबदार्‍या येतात. स्त्री म्हणून त्यांना कुटुंबाकडे पहावे लागते. अशावेळी त्यांना अभिनयासाठी घराबाहेर पडण्यास घरातून पाठींबा मिळतोच असे नाही. त्यामुळे उत्तम अभिनयाची क्षमता असूनही त्या अभिनयापासून दूर गेल्याची उदाहरणे आहेत.

अशावेळी महिलांनी ठामपणा दाखवावा, बंडखोर व्हा. आवड जोपासणार हे ठामपणे घरातल्यांना सांगायला हवे. कारण आज समानतेचे युग आहे. माझ्यावर विश्वास ठेवा हे ठामपणे सांगता आले पाहिजे.बाहेरच्या जगात वावरतांना स्त्रीला निडरता आली पाहिजे, आपले म्हणणे मांडणे जमले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला विरोध, नकार देता आला पाहिजे, अन्याया विरोधात आवाज उठवता आला पाहिजे.

– संपर्क – मो. 94205 59260

- Advertisment -

ताज्या बातम्या