लाचखोर लिपिकास 4 वर्षे सक्तमजुरी

jalgaon-digital
4 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

लिलावाद्वारे अधिकृत वाळुचा ठेका घेवूनही त्याच्यावर कारवाईचा बनाव करीत तत्कालीन नायब तहसिलदार व त्यांचा कनिष्ठ लिपिक यांनी 20 हजाराची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर 16 हजारांची लाच स्वीकारतांना कनिष्ठ लिपिकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल खटल्यावर अंतिम सुनावणी होवून अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी लाचखोर कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती याला चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली तर तत्कालीन नायब तहसिलदार शितल सावळे यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.

याबाबतची हकिकत अशी की, कनोली तक्रारदाराने 2014 साली लिलावाद्वारे प्रवरानदी पात्रातून वाळु उचलण्याचा अधिकृत परवाना मिळविला होता. त्यानुसार त्यांना 31 सप्टेंबर 2014 पर्यंत वाळु उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या दरम्यान 13 जून 2014 रोजी संगमनेर तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती याने कनोलीजवळ त्या ठेकेदाराचे दोन ट्रॅक्टर पकडले व त्याचा पंचनामा करुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार ठेकेदराने लिपिक भारती यांची भेट घेतली असता त्यांनी कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्याचे सांगत तुमचा परवाना व वाळुच्या पावत्या घेवून नायब तहसिलदार शितल सावळे यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने प्रत्येकी दोन ब्रासच्या एकूण 25 पावत्या घेवून 4 जुलै 2014 रोजी नायब तहसिलदार शितल सावळे यांची तहसिल कार्यालयात जावून भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेनंतर नायब तहसिलदार सावळे यांनी कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून 20 हजारांची मागणी केली. यावेळी फिर्यादीने आपल्या जवळील वाळु वाहतूकीचा परवाना व पावत्या दाखवूनही त्यांनी बाकीचे सांगू नका, पैसे द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा असे फिर्यादीला ठणकावून सांगितले.

या प्रकारानंतर तक्रारदाराने एक-दोन दिवसांत पैशांची व्यवस्था करतो तोपर्यंत वाट बघा असे सांगत थेट अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अशोक देवरे यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांची तक्रार नोंदवून त्यांना आवश्यक त्या सूचना देत माघारी पाठविण्यात आले. ठरल्याप्रमाणे 7 जुलै रोजी तक्रारदारासह एका साक्षीदाराला नायब तहसिलदारांकडे पाठविण्यात आले, यावेळी मागण्यात आलेली रक्कम कमी करण्याची विनंती तक्रारदाराने केली.

त्यानुसार दुसर्‍या दिवशी 16 हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे 8 जुलै 2014 रोजी तक्रारदाराने कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती (वय 54, रा. मूळ पढेगाव, ता.कोपरगाव) यांच्याकडे 16 हजारांची रक्कम सोपविली. याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा घालीत त्यांना रंगेहाथ पकडले व त्याच्यासह नायब तहसिलदार शितल राजधर सावळे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7, 12, 13 (1) (ड) सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचे दोषारोपपत्र संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावरील सविस्तर सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सरकारी पक्षाने सादर केलेले चार साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपी क्रमांक दोन सुभाष विठ्ठल भारती याला भ्रष्टाचार कायद्याचे कलम 7 अन्वये 3 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच कलम 13 (2) नुसार चार वर्ष सक्त मजूरी व 4 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 4 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तर आरोपी क्रमांक एक तत्कालीन नायब तहसिलदार शितल राजधर सावळे यांना मात्र संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष सुटका केली आहे.

सदर खटल्याचे संपूर्ण कामकाज सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण डावरे, सहाय्यक फौजदार एस. डी. सरोदे, सहाय्यक फौजदार कैलास कुर्‍हाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस नाईक दिपाली दवंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी यांनी मदत केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *