Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedलाच घेताना तंत्रज्ञ व मदतनीसला पकडले

लाच घेताना तंत्रज्ञ व मदतनीसला पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेलचे वीज बिल दर महिन्याला कमी करून देण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून 60 हजार रुपये स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बायजाबाई जेऊर (ता. नगर) सेक्शनचा तंत्रज्ञ व मदतनीस यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तंत्रज्ञ बाळासाहेब पांडुरंग टिमकरे (वय 43 रा. इमामपूर ता. नगर) व मदतनीस शिरीष रावसाहेब भिसे (वय 45 रा. खोसपुरी ता. नगर) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने सोमवारी ही कारवाई केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील एका व्यक्तीचे पांढरीपूल येथे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलचे येणारे वीज बील हे दर महिन्याला कमी येईल, अशी व्यवस्था उपकार्यकारी अभियंता कोपनर यांना सांगून कायमस्वरूपी करून देण्यासाठी तंत्रज्ञ टिमकरे व मदतनीस भिसे यांनी हॉटेल व्यावसायिकाकडे 70 हजार रुपयांची मागणी केली. त्या व्यावसायिकाने अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये लोकसेवक यांनी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 60 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. सोमवारी आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाईदरम्यान सदर लाचेची 60 हजार रुपये रक्कम पांढरीपूल येथील शिवलीला भेळ सेंटर येथे भिसे याने पंचासमक्ष स्विकारून टिमकरे याच्याकडे दिली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, रवींद्र निमसे, संध्या म्हस्के, राधा खेमनर, हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या