जळगाव : होम क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव –

जिल्ह्यात जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. असे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा इंन्सिडंन्ट कमांडर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरिक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले की, काही नागरिक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असताना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहे हे अतिशय गंभीर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरिकांची अचानक तपासणी करावी. जे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री.गाडीलकर यांनी दिले आहे.

जिल्ह्यात 31 मेपर्यंत कलम 144 कलम लागू

जळगाव, दि. 18 (जिमाका) – देशात आणि राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या 2 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपुर्ण जिल्हाहद्दीत 31 मे, 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 जारी करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आलेल्या कलम 144 नुसार या काळात जिल्ह्यतील नागरिकांना अनावश्याकरित्या फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकाळात सभा, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजानाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

शिवाय सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.
त्याचबरोबर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, 5 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच राहावे. तथापि, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी यांना मुभा देण्यात आलेली आहे.

तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे जिल्ह्यातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *