कापडणेच्या अरुण मोरे यांना शौर्य पदक

jalgaon-digital
2 Min Read

कापडणेे Kapdane । प्रतिनिधी

येथील रहिवाशी व मुंबई येथील पोर्ट प्राधिकरण (Port Authority) (जहाज मंत्रालय) बंदरात अग्निशमन दलात (fire brigade) नोकरीला असलेले अरुण यशवंत मोरे (Arun More) यांना शौर्य पुरस्काराने (Bravery medal) सन्मानीत करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान करण्यात आला. समुद्रात लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावत, अविरत चार रात्र व पाच दिवस आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्याने देशाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान टळले होते. याची दखल घेत अरुण मोरे यांना नुकतेच शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आग विझवण्याचा कार्यात जहाज मंत्रालयाच्या वतीने एकूण 69 लोकांचा सन्मान करण्यात आला.

मुंबई समुद्रात, जवाहर द्वीपच्या बुचर आर्यलँड या बेटावर अरुण मोरे हे आपल्या सहकार्‍यांसोबत कामावर होते. यावेळी सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली व अचानक बेटावरील भव्य अशा 35 हजार मॅट्रिक टनच्या डिझेल टँकवर वीज कोसळली व यामुळे बेटावर आग लागली. ही आग भारत सरकारच्या मुंबई पोर्ट प्राधिकरण (जहाज मंत्रालय) अग्निशमन दलाच्या जवानांनी व अधिकार्‍यांनी सतत चार रात्र पाच दिवस ही आग विझवली. पाच दिवस या जवानांनी डोळ्याची पापणी न लावता हे जोखिमेचे काम करून आग विझवली व देशाचे मोठे आर्थिक नुकसान यावेळी टाळले होते.

या अभियानाची दखल घेत एकूण 69 अधिकारी व जवानांचे खात्याअंतर्गत व राष्ट्रीय पातळीचे समजले जाणारे शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. चांदीचे मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी गौरविण्यात आले. कापडणे येथील रहिवासी अरुण मोरे हे सर्वसाधारण कुटूंबातील कै. यशवंत झेंडू मिस्तरी यांचे चिरंजीव तर धुळे येथील रहिवासी रत्नाबाई राजू मिस्तरी यांचे भाऊ आहेत. त्यांच्या या कामगिरीचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

देशसेवा करण्याची संधी मिळाली गेल्या 23 वर्षांपासून जहाज मंत्रालयात अग्निशमन दलात कार्यरत आहे. 2017 मध्ये आलेला अनुभव आयुष्यातील भयानक व अविस्मरणीय होता. यावेळी अधिकार्‍यांसह सर्व जवानांनी बेटावर लागलेली आग पाच दिवस सतत विझवली. नशिबाने गरिबीच्या परिस्थितीतून कापडणे सारख्या ग्रामीण भागातून जाऊन देशसेवा करण्याची चांगली संधी मिळाली याचा आनंद आहे.

अरुण यशवंत मोरे, मुंबई पोर्ट विभाग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *