चोवीस तासातच ब्राम्हणी परिसरात दुसरा दरोडा

उंबरे |वार्ताहर| Umbare

ब्राम्हणी येथे सोनई – राहुरी रस्त्यालगत राहणारे संतोष चावरे व डॉ. सुभाष चावरे या बंधूंच्या घरी शनिवारी पहाटे दरोडा पडला. सुमारे अडीच ते तीन तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. उषाताई संतोष चावरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग दुसर्‍या दिवशी ब्राम्हणी परिसरात दरोडा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

ब्राम्हणी परिसरात चेडगाव रस्त्यावर रावसाहेब तरवडे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना होऊन 24 तासांचा कालावधी लोटत नसतानाच शनिवारी पहाटेच्या दरम्यान पुन्हा दरोडा पडला. दरम्यान पाच ते सहा चोरटे असल्याची माहिती मिळते. सुरुवातीला चोरटे खळवाडी परिसरातील एक-दोन घरी गेले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अपयश आले. त्यानंतर भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीवर गेले. कोणीतरी जागे असल्याचा अंदाज घेतला.त्याठिकाणी चोरी करणे अशक्य वाटल्याने त्यांनी आपला मोर्चा उसाच्या पिकातून चावरे यांच्या घराकडे वळविला. चोरट्यांनी मागील बाजूचे गेट तोडून प्रवेश केला. प्रत्येकाच्या हाती चाकूसारखे हत्यार होते.

चावरे यांच्या घरात घुसून संतोष चावरे यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला. त्या भीतीपोटी पूर्ण कुटुंब धास्तावले. मुलाच्या आईकडून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेतल्या. उचकापाचक करून काही पैसे व दागिने चोरले. याशिवाय ब्राह्मणी परिसरात दिव्यांग आशासेविका उषाताई चावरे यांच्या अंगावरील दागिने ओरबडून चोरट्यांनी पळविले.दुसर्‍या खोलीत झोपलेले डॉ.सुभाष चावरे यांच्या घराची कडी बाहेरून लावून घेतली. दरम्यान डॉ.चावरे यांनी शेजारी राहणारे वने व पटारे कुटुंबांना घटनेची माहिती दिली. लागलीच चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने शेतातून पळ काढला. तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते एकत्रित येत उसात पळाले. हातात हत्यार त्यात अमावस्याची काळोखी रात्र होती. उसात शिरून जीव धोक्यात नको म्हणून पाठलाग करणारे शेजारी पाठीमागे फिरले. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून दिवसभरात विविध पथके विविध करून शोधार्थ पाठविण्यात आली आहे.

पहिलीच चोरीची घटना ताजी असतानाच चोवीस तासाच्या आतच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण करत तपासाचे आव्हान उभे केले. या घटनांचा वेळीच योग्य तपास लावून चोरीच सत्र थांबून पुढील काळात जनतेला दिलासा मिळावा एवढेच आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पीआय राजेंद्र इंगळे, पीएसआय तुषार धाकराव, एलसीबी पथक, श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक येऊन गेले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *