बोठेला मदत करणार्‍या तनपुरेला जामीन मंजूर

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला मदत करणारा नगरचा महेश तनपुरे याला पारनेर न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची

माहिती वकिल अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी दिली. दरम्यान हैदराबादमधील वकिल जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, तनपुरे याच्या घराची पोलिसांनी मंगळवारी झडती घेतली. घर झडतीमध्ये काही महत्वाच्या वस्तू हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटक करण्यात आलेल्या बोठेला एमआयडीसीतील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

त्याच्या भोवती एक पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचा बंदोबस्त आहे. त्याला तीन दिवसांपासून नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयात चौकशीसाठी आणले जात आहे. मंगळवारी दुपारी त्याला चौकशीसाठी आणले होते. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: बोठे याची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

30 नोव्हेंबर 2020 रोजी जरे यांची हत्या करण्यात आली होती. याचा मुख्य सूत्रधार बोठे असल्याचे समोर आल्यानंतर तो पसार झाला होता. पसार काळात तो हैदराबादमध्ये राहत होता. पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. त्याला हैदराबादमध्ये मदत करणार्‍या वकिल चंद्रप्पासह त्याचे तीन साथीदार तसेच नगरमधून मदत करणारा महेश तनपुरे यांनाही पोलिसांनी अटक केली होती.

त्यांना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. ठाणगे यांनी बाजू मांडली. दोन तासांचा युक्तीवाद करताना अ‍ॅड. ठाणगे यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायालयाने तनपुरे याच जामीन अर्ज मंजूर केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *