Friday, April 26, 2024
Homeनगरबोठेला vip ट्रिटमेंट?, पोलीस संशयाच्या भोवर्‍यात

बोठेला vip ट्रिटमेंट?, पोलीस संशयाच्या भोवर्‍यात

पारनेर |प्रतिनिधी| Parner

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून अटक करण्यात आलेला

- Advertisement -

मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आलिशान खाजगी वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात येऊन त्यास स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आले. त्याला रविवारी पारनेर न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बोठे याच्यासह त्याच्या हैद्राबादी वकीलास पारनेरच्या पोलीस ठाण्यात व्हीआपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याने पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला आहे. वकील जनार्दन अकुला यास न्यायालयात नेतांना व परत आणतांना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या. मात्र, महेश तनपुरे याला बेड्या घालण्याची तत्परता दाखविण्यात आली होती. बोठेचीही बडदास्त ठेवली जात आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची ही बडदास्त पाहून पोलीस ठाणे परिसरात उपस्थित सर्वच अचंबित झाले. बोठेला ठेवण्यासाठी एक बराक मोकळी करण्यात आली असून तिची स्वच्छता करून ठेवण्यात आली होती.

नगर-पुणे रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली होती. जरे हत्याकांड प्रकरणात बोठे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. तेंव्हापासून तब्बल 103 दिवस बोठे फरार होता. बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने पोलीसांच्या कार्यपद्धती विषयी शंका उपस्थित करण्यात येत होत्या.

जरे कुटुंबियांकडून बोठेला अटक करण्याची मागणी वारंवार केली जात होती. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अत्यंत संयम दाखवत तपास सुरू ठेवला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बोठे भोवती फास आवळला. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोठे जरबंद झाला. शनिवार संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास बोठेला सुपे (पारनेर) पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे अटकेची कारवाई पूर्ण करुन त्याला पारनेर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. मात्र आता पोलीस अधीक्षक बोठेची मदत आणि बडदास्त ठेवण्यासाठी झिजणार्‍यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या