बोस्टनचे स्वप्न पाहणारी नाशिक नगरी

jalgaon-digital
4 Min Read

दख्खनच्या (दक्षिण) पठारावर पश्चिम बाजूस व दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या काठावर वसलेली पुरातन मंत्रनगरी नाशिकचा प्रवास मेट्रो शहराच्या दिशेने सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाच्या या मोठ्या शहराचा गेल्या पंधरा वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे…

नाशिक नगरीचा उल्लेख यादव, मुघल, पेशवे काळातील संदर्भग्रंथात आहे. श्री प्रभू रामचंद्रांनी माता सीता, लक्ष्मण यांच्यासोबत दंडकारण्यात बारा वर्षे वनवासात घालविले आहे. देव-दानवाच्या लढाईत समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृत कलशातील काही थेंब पवित्र गोदावरी नदीत पडल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आहे.

यामुळेच याठिकाणी शेकडो वर्षांपासून भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची पताका जगभरात झळकलेली आहे. अशाप्रकारे पवित्रनगरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक शहरात अनेक उद्योग भरभराटीला येत आहेत. मुंबई, पुणे व नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणात राज्य व केंद्राचे आता नाशिकवर विशेष लक्ष असून यामुळे राज्य व केंद्राचे अनेक मोठे प्रकल्प नाशिकला येत आहेत.

नाशिक नगरीत निर्माण झाले रस्त्यांचे जाळे

नाशिक महापालिकेत 25 गावांचा समावेश झाल्यानंतर आता शहराचे क्षेत्रफळ 259.12 चौरस किलोमीटर असून पुढच्या काळात नाशिक महापालिकेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. गेल्या 29 वर्षांत शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे.

यात 1331.55 कि. मी. डांबरी रस्ते, 226.81 कि. मी. काँक्रीट रस्ते, 284.64 कि. मी. खडीचे रस्ते आणि 117 कि. मी. झोपडपट्टी भागातील रस्ते अशी 1960 कि. मी. रस्त्यांची कामे झाली आहे. यात सन 2014 – 15 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक नगरीचे रुप पालटण्याचे काम झाले असून यात अंतर्गत व बाह्य वळण रस्ते, शहरातील रस्त्यांवर माहितीचे फलक आदी कामांचा समावेश आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात नाशिक शहराचा स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार झाला आणि तो केंद्राकडे पाठविण्यात आला. यात नाशिककरांनी केलेल्या विकासाच्या विविध सूचना अंतर्भूत करण्यात आल्या.

गेडाम यांच्या काळात नाशिक महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी नाशिकला अत्याधुनिक शहर बनविण्यासाठी बोस्टन (अमेरिका)चा अभ्यास दौरा केला होता. सन 2019 – 20 या आर्थिक वर्षात शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी 170 कोटींच्यावर निधी खर्च करण्यात आला आहे. आता नवीन आर्थिक वर्षात याच कामांसाठी पुन्हा 160 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच शहरात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक सेवा सुविधांचा सुलभतेने वापर करता यावा, याकरिता अडथळामुक्त (बॅरिअर सिटी) आधारित उपाययोजना सुरू करण्यात येत असून मुख्य रस्ते, चौक, फूटपाथ याचे नियोजन केले जात आहे.

तसेच शहराच्या विकास आराखड्यात परदेशाच्या धर्तीवर आता सायकल ट्रॅक विकसित करण्याचे नियोजन असले तरी शहरात प्रायोगिक तत्वावर नाशिक पश्चिम विभागात कृषीनगर याठिकाणी 900 मीटर लांबीचा ट्रॅक विकसित करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत 17 कोटी खर्च करून तयार झालेल्या पहिल्या पायलट रोडवर सायकल मार्गिका तयार करण्यात आली आहे.

अशाप्रकारे नाशिक शहराला अत्याधुनिक रुप देण्यासाठी दळणवळणासाठी अत्यावश्यक रस्त्यांचे विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. आजचा रस्ते विकासाचा वेग पाहता पुढच्या काळात महापालिका क्षेत्र ओझर, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरीपर्यंत गेले तरी पुढच्या पंचवीस वर्षांत दळणवळणासाठी रस्ते मोठे होऊन शहराचा विकासाचा वेग निश्चित वाढणार आहे.

शहर बससेवा लवकरच

नाशिक महापालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली असून केवळ सेवा म्हणून महापालिकेची शहर बससेवा प्रारंभ होण्यास काही दिवसांची प्रतीक्षा आहे. शहरात सक्षम वाहतुकीचा पर्याय म्हणून महापालिकेने कॉम्प्रेहेसिव्ह ट्राफीक अ‍ॅण्ड ट्रान्सर्पोटेशन प्लॅन तयार करून घेतला आहे.

या अहवालानुसार शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी शहर बससेेवा सर्वोत्तम पर्याय असल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भाती प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमीटेड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीकडून आता प्रदूषणमुक्त शहरासाठी 200 सीएनजी, 150 इलेक्ट्रिक व 50 डिझेल अशा 400 बसेस शहरात धावणार असल्याचे नियोजन आहे.

यातील तोटा लक्षात घेऊन तूर्त 100 बसेस कमी करण्यात आल्या आहेत. शहरात 250 बसेस येऊन दाखल झाल्या असून पुढच्या काही दिवसांत शहर बससेवा कार्यरत होणार आहे. राज्य शासनानकडून नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पाअंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास गेल्या 9 सप्टेंबर 2019 रोजी मान्यता देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *