Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसीमांवर नाकाबंदी, होणार कडक तपासणी

सीमांवर नाकाबंदी, होणार कडक तपासणी

नाशिक । Nashik

करोनाचा वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्यशासनाने संचार बंदी व कडक निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणीसाठी नाशिक शहर तसेच ग्रामिण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हा तसेश शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करून कडक तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्य शासनाच्या निर्बंधांच्या अंमलबजावणी बाबत पोलीस आयुक्त दिपक पांडे तर ग्रामिण दलाचे अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. शहरात मागील प्रमाणेच शहरात येणार्‍या सर्व मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत अशा विविध 28 ठिकाणी बॅरेकेंडींग करण्यात आले आहे.

यासह शहरातील भाजीपाला मार्केट, बाजारपेठा, वाहतुक तसेच शहरातील गर्दी होणार्‍या प्रमुख ठिकाणांवर चेकपाँईंट तयार करण्यात आले आहेत. शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असे मिळून सुमारे तीन हजाराचे पोलीस दल शहरात कार्यरत असणार आहे.

यासह त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत नागरीकांना ध्वनीक्षेपाद्वारे सातत्याने आवाहन करण्यात येत असून विनाकारण फिरताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांची गस्ती पथके कार्यरत राहणार असून त्या त्या हद्दीत ते दिवसभर गस्त घालणार आहेत.

ग्रामिण पोलीस दलानेही जिल्ह्यात येणार्‍या विविध प्रमुख मार्ग हे सीमेवर रोखण्याची तयारी केली आहे. सर्व सीमांवर तपाणी नाके तयार करण्यात आले असून यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मालेगाव सह सर्व मोठ्या शहरांमध्ये त्या त्या पोलीस ठाण्यांअर्तगत गर्दीचे ठिकाणे, बाजार पेठा अशा ठिकाणी चेक पॉइंट असणार आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामिण भागाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी 40 पोलीस ठाण्यांअंतर्गत कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून राज्य शासनाने शनिवार व रविवारी विकेंड कडक लॉकडाऊन तर इतर वारी कडक निर्बंध बंधनकारक केले होते. परंतु तरिही कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने शासनाने अखेर संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, दूध, किराणा व भाजीपाला हा अपवाद वगळता इतर सर्व अस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत, हॉटेल तसेच खानावळी, खाद्यपर्दाच्या हातगाड्या येथे पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे बंधन आहे. इतर दिवसांप्रमाणे शासनाच्या आता रात्री तसेच दिवसाही संचारबंदी असणार आहे.

परवानगीची गरज नाही

मागील लॉकडाऊनप्रमाणे यावेळी जिल्हा तसेच आंतरराज्य वाहतुकीस बंदी नाही. खासगी वाहतुकीस बंदी असली तरी अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आलेली आहे. तर ट्रान्सपोर्ट वाहतुक सुरू राहणार आहे.

यामुळे शहर तसेच ग्रामिण पोलीसांनी आंतरजिल्हा तसेच आंतर राज्य वाहतुकीसाठी कुठल्याही परवान्यांची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रवास हा अत्यावश्यक सेवेसाठी असेल तरच सुट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यावेळी पोलीस तसेच महसुल कार्यालयाचे मदतीसाठी कोरोना कक्ष नसणार आहेत.

तर कडक कारवाई

संचारबंदी लागु करतानाच शासनाने काय सुरू राहणार, काय बंद राहणार, कशाला परवानगी आहे किंवा नाही हे अगदी स्पष्ट केले आहे. आता दिवसरात्र संचारबंदी असणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारासच सवलत असणार आहे. विनाकारण कोणी फिरताना दिसल्यास अशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

– दिपक पांडे, पोलीस आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या