Friday, April 26, 2024
Homeनगरलष्कराचा न फुटलेला बॉम्ब निकामी करताना स्फोट; एक ठार

लष्कराचा न फुटलेला बॉम्ब निकामी करताना स्फोट; एक ठार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जवळील खारेकर्जुने येथील के. के. रेंज या लष्कराच्या हद्दीत न फुटलेला बॉम्ब भंगार समजून चोरून आणत निकामी करताना स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास खारेकर्जुने गावाच्या माळरानावर हा प्रकार घडला. यात भीवा सहादू गायकवाड (वय- 55, रा. खारेकर्जुने) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली.

नगरजवळ के. के. रेंज या लष्करी हद्दीत जवानांना रणगाड्याव्दारे दारू गोळ्याचे प्रशिक्षण दिले जाते. या परिसरात जवळच भागात खारेकर्जुने गाव आहे. सराव करताना लष्कराकडून डागलेले तोफगोळे अनेक फुटत नाही. तर फुटलेल्या तोफगोळ्यातून शिसं मिळते. यामुळे या भागातील तरूण लष्कराच्या हद्दीत विनापरवाना घुसून फुटलेले तर कधी न फुटलेले तोफगोळे जमा करून ते भंगारात विकत असतात.

- Advertisement -

यापूर्वी या भागात अनेकवेळा न फुटलेले तोफगोळे निकामी करताना त्याचा स्फोट होऊन दुर्घटना झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. शुक्रवारी सकाळी अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. लष्कराच्या सरावानंतर खारेकर्जुने परिसरात पडलेले गोळे निकामी करून त्यातील शिसं काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या तोफगोळ्याचा स्फोट झाला.

यात भीवा सहादू गायकवाड (वय- 55) हे ठार झाले. या भागात लष्कराच्या हद्दीतून भंगार जमा करून ते विकून त्यावर पोटपाणी अवलंबून असणारी अनेक कुटुंब हा धोकादायक उद्योग करत आहेत. निकामी बॉम्बगोळे गोळा करण्याचा ठेकाही देण्यात आलेला आहे. मात्र, ठेकेदाराची नजर चुकून तरुण लष्करी हद्दीत घुसून डागलेले गोळे गोळा करतात. हा प्रकार मयत गायकवाड यांनी केला. सापडलेला बॉम्बगोळा माळरानावर निकामी करत असतानाच त्याचा स्फोट झाला. त्या धमाक्यात गायकवाड हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच खारेकर्जुने गावातील लोकांनी माळरानावर धाव घेतली.

वर्षभरात तिसरी घटना
मे 2019 मध्ये गौतम वाघ तर जुलै 2019 मध्ये अक्षय गायकवाड आणि संजय धिर्डे या तिघांचा असाच बॉम्बगोळा निकामी करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षातील ही पहिली अन् वर्षभरातील तिसरी घटना आज घडली. डागलेल्या बॉम्ब मधील शिसं किंमती असल्यामुळे जीवाची पर्वा न करता येथील ग्रामस्थ त्याच्या चोरीसाठी जीव धोक्यात घालतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या