Tuesday, April 23, 2024
Homeनगरबोगस ऊसतोड मजूर आणि मुकादमांकडून होणार्‍या वाहतुकदारांच्या उचलेला हवे संरक्षण

बोगस ऊसतोड मजूर आणि मुकादमांकडून होणार्‍या वाहतुकदारांच्या उचलेला हवे संरक्षण

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

कारखान्यांचा साखर हंगाम सुरू होताच बोगस ऊसतोड मजूर व मुकादमांनी वाहतुकदारास गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात प्रचंड ऊस आणि कारखान्यांच्या वाढत्या गाळप क्षमतेमुळे मजूर मिळविण्याच्या स्पर्धेमुळे हंगाम सुरू झाल्यावर या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकदारांना कारखाना वाहनामागे सहा ते सात लाख उचल देतो आणि वाहतूकदार व मुकादम यांच्याशी करार करतो. वाहतूकदार पदरचे पैसे घालून मुकादमाच्या मध्यस्थीने दहा ते बारा लाख रुपये एका टोळीला म्हणजे दहा कोयत्यांना (मजूर जोडपे) देतो. मजूर करारात अडकत नाही. मजूर किंवा मुकादम पळाले; तरी वाहतुकदारास उचल फेडावीच लागते. त्यामुळे अशा उचलेला संरक्षण मिळायला हवे.

- Advertisement -

कारखाना सुरू होणार म्हणून वाहतूकदार आपापली वाहने घेऊन उचल दिलेले मजूर आणायला गेले. मात्र अनेक वाहन चालकांना आपल्या टोळ्या घरी नसल्याचे किंवा मुकादम गायब असल्याचे आढळून आले. काही घरांना कुलूप होते. फोन केले असता स्वीच ऑफ लागले. अनेक जिल्ह्यांत हे प्रकार सर्रासपणे घडत आहेत, असे वाहतुकदारांनी सांगितले.

काही ठिकाणी मजूर परागंदा झाले; तर काही जणांच्या मुकादमाला मजुरांनी फसविल्याने मुकादम गायब झाले. या प्रकारांनी वाहतूकदार मोडून पडतील. पोलिसांकडे तक्रार करावी की कारखान्याच्या संबंधित विभागामार्फत रिकव्हरीच्या नोटिसा द्याव्यात, अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. काही ठिकाणी पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये यंत्रणेने मदत करावी, अशी मागणी होत आहे. साखर आयुक्तालयाने मजुरांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना ओळखपत्र त्वरित दिले पाहिजे. एक मजूर अनेक कारखान्यांशी करार करतो आणि याचा फायदा बोगस ऊसतोड मजूर आणि मुकादम घेताना दिसत आहेत. ते यानिमित्ताने समोर येईल आणि वाहतूकदारांची फसवणूक देखील टळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या