‘बोगस शिधापत्रिका’ गुन्हा दाखल न झाल्यास तहसिलसमोर ठिय्या आंदोलन – अ‍ॅड. गणपुले

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

बेकायदेशीररित्या दारिद्य्र रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर करणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकार्‍याच्या विरोधात तहसीलदारांनी गुन्हा दाखल न केल्यास आपण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी दिला आहे. दि. 12 ऑक्टोबर पर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास आपण दि. 13 ऑक्टोबर रोजी स्वतः शिवसेनेच्या त्या पदाधिकार्‍याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचेही गणपुले यांनी सांगितले. गणपुले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेचा तो पदाधिकारी चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

संगमनेर शहरातील शिवसेनेच्या एका विद्यमान पदाधिकार्‍याने बेकायदेशीररित्या पिवळे रेशनकार्ड काढले आहे. त्याने दारिद्र्यरेषेखाली असल्याचे भासवून या शिधापत्रिकेचा लाभ घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष गणपुले यांनी या पदाधिकार्‍यांनी विरोधात तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने तहसीलदारांनी त्वरीत लक्ष घालून संबंधित पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गणपुले यांनी तक्रार अर्जाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. शिधापत्रिकेचा गैरफायदा घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे. तहसीलदारांनी हा तक्रार अर्ज पुरवठा विभागाकडे दिला असून सविस्तर चौकशी घेऊन अहवाल पाठवावा, अशी सूचना पुरवठा अधिकार्‍यांना केली आहे.

तक्रार अर्ज देऊन अनेक दिवस होऊनही तहसीलदारांनी अद्याप शिवसेनेच्या या पदाधिकार्‍या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत गणपुले यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदारांनी फिर्याद न दिल्यास आपण स्वतः शिवसेनेच्या पदाधिकारी विरोधात फिर्याद देणार आहोत असे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तक्रार अर्ज दिल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत शासकीय अधिकार्‍याने फिर्याद दिली नाही तर खाजगी व्यक्ती सुद्धा फिर्याद देऊ शकते. आपल्या तक्रार अर्जाला 12 ऑक्टोबर रोजी नव्वद दिवस पूर्ण होतात. या मुदतीत तहसीलदारांनी फिर्याद न दिल्यास दि. 13 ऑक्टोबर रोजी आपण स्वतः शिवसेनेच्या पदाधिकार्‍या विरोधात फिर्याद देऊ असे गणपुले यांनी सांगितले.

आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार आहोत. आपल्या तक्रार अर्जाबाबत कोणती कार्यवाही केली असे तहसीलदारांना आपण विचारणार आहोत. अर्जाबाबत कार्यवाही न केल्यास दि. 11 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणपुले यांनी दिला आहे.

अ‍ॅड. गणपुले त्यांनी बोगस शिधापत्रिका चा सखोल अभ्यास केला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिधापत्रिकेचा मुद्दा उपस्थित झाल्याने शिवसेनेचे नेते या पदाधिकारी बाबत काय भूमिका घेतात याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *