Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर तालुक्यात बोगस डॉक्टर जेरबंद; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

नगर तालुक्यात बोगस डॉक्टर जेरबंद; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रूईछत्तीशी (ता. नगर) गावात बोगस डॉक्टर आढळून आला आहे. नगर तालुका आरोग्य विभाग व नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी टाकलेल्या छाप्यात या बोगस डॉक्टरचे कारनामे समोर आले आहेत. ज्ञानदेव निवृत्ती पवार (वय 63) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

रूईछत्तीशी गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांचे पथक आरोग्य विभागाच्या मदतीसाठी गेले. त्यांच्या संयुक्त पथकाने पंचासमक्ष पवार याच्या सुरू असलेल्या दावाखान्यात छापा टाकला. तेथे मोठ्या प्रमाणात गोळ्या-औषधांचा साठा मिळून आला.

पथकाने छापा टाकला असता पवार हा रुग्णांवर उपचार करत असताना मिळून आला. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. डी. बी. बोस या नावाने ज्ञानदेव पवार हा त्याचा दावाखाना चालवित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी डॉ. बोस यांच्याशी संपर्क साधला आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान या बोगस डॉक्टराने केलेल्या उपचारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते. त्या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसांशी रात्री उशिरापर्यंत संपर्क केला नव्हता. पवार याच्यावर यापूर्वी देखील नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी दवाखाना सील करण्याचे आदेश दिले आहेत. दवाखान्यांतील उपचार सुरू असणार्‍या रुग्णांचा अभिप्राय घेण्यात आला असून आम्हाला डॉ. बोस उपचार करत नसून बोगस डॉ. पवार उपचार करत आहेत, असे सांगितले. विनाबिल औषधे आढळून आल्याने औषधे आली कोठून, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी डॉ. बोस यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

बोगस डॉ. पवार यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक युवराज चव्हाण व आरोग्य अधिकारी डॉ.मांडगे करत आहेत. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू चव्हाण, वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका स्तरावरून नियंत्रण समिती स्थापन करून कोणत्या हॉस्पिटलला कोणती औषधे देण्याचा आणि कोणत्या डॉक्टरांना कोणते उपचार करण्याचा परवाना आहे, याची सखोल चौकशी केली जाईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या