Friday, April 26, 2024
Homeराजकीयघरकुल योजनेत तीन हजारावर बोगस लाभार्थी : खा.डॉ.हिना गावीत

घरकुल योजनेत तीन हजारावर बोगस लाभार्थी : खा.डॉ.हिना गावीत

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधलेल्या घरकुलांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने तपासणी केली असता त्यात 3 हजार 193 बोगस लाभार्थी आढळून आले आहेत.

- Advertisement -

यासह जिल्ह्यातील मनरेगा, गोठा बांधकाम, शौचालय आदी योजनांमध्ये मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून याबाबत आपण केंद्राकडे तक्रार करणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा खा.डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात खा.डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत खा.डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, दिशाच्या बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मी केंद्राकडे तक्रार केली होती. त्यानुसार 1 लाख 3 हजार 165 यात नावे होती. पैकी 1 लाख 171 नागरीकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. पैकी 99 हजार 591 घरकुलांना मंजूरी मिळाली होती.

यात 69 गावांतील 61 ग्रामपंचायतीमधील 28 हजार घरकुलांचा समावेश होता. चौकशी समितीने चौकशी केली असता ज्या लोकांच्या नावांवर तफावत आहे असे 1 हजार 202, यासह इतर असे 3 हजार 193 बोगस लाभार्थी समोर आले आहेत. हे फक्त तीन तालुक्याची स्थिती आहे. इतर तालुक्यातही इतर घरकुलांचेही चौकशी समिती करणार आहे. यासोबत मनरेगा, पंचायत समिती अंतर्गत गोठे, विहिर योजना, शौचालय आदी कामांमध्येही मोठी अनियमीतता दिसून येत आहे.

या सर्वांची चौकशीसाठी तालुकास्तरावर कमिटया नेमण्यात येणार आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा खा.डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यासह बँकांमध्ये कर्ज मंजूरीसाठी कोणी एजंट समोर येत असेल तर त्याची तक्रार करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.गावित पुढे म्हणाल्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 74 शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रूपये केंद्र सरकार टाकत आहे. जिल्ह्यात 1 लाख 66 हजार खातेधारक असून 1 लाख 43 हजार लाभार्थी याचा लाभ घेवू शकतात. या योजनेत लाभार्थी वंचित राहिले असतील.

त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. यासह जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत किसान क्रेडीटकार्ड योजना राबविण्यात येत आहे. 1 लाख 60 हजारापर्यंत शेतकर्‍याला विनातारण कर्ज मिळते तर 3 लाखापर्यंत विना व्याजाने कर्ज मिळते. जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 686 शेतकर्‍यांना हे कार्ड देण्यात आहे. उर्वरीत शेतकर्‍यांनी हे कार्ड बनवून केंद्र सरकारचा योजनेचा लाभ घ्यावा.

यंदा जिल्ह्यात शेतकर्‍यांना सर्वात कमी कर्ज वाटप झाले आहे. 1 लाख 66 हजार खातेधारकांपैकी फक्त 19 हजार 152 शेतकर्‍यांना कर्ज देण्यात आले आहे. मागील वर्षी हाच आकडा 24 हजारावर होता. यात अक्कलकुवा तालुक्यात फक्त 357 शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला. 30 हजार वनपट्टे धारकांपैकी 359 शेतकर्‍यांना कर्ज वाटप झाले आहे.

केंद्र सरकारचा योजना व कर्ज वाटपासाठी लवकरच तालुकास्तरावर मेळावे घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला आ.डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या